हिंगोलीत दहावीच्या ३१४ विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पेपरला दांडी, ५ कॉपीबहाद्दर पकडले
By रमेश वाबळे | Published: March 7, 2024 07:41 PM2024-03-07T19:41:58+5:302024-03-07T19:42:07+5:30
परीक्षेत काॅपीला आळा बसावा, यासाठी विभागीय मंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोली : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. ७ मार्च रोजी दहावीचा इंग्रजीचा पेपर झाला. यात भरारी पथकाच्या तपासणीत पाच काॅपीबहाद्दर आढळून आले, तर तब्बल ३१४ विद्यार्थ्यांनी या पेपरला दांडी मारली.
शिक्षण विभागाच्या वतीने दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ५४ परीक्षा केंद्रांची स्थापना केली आहे. या परीक्षा केंद्रांवर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. ७ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर सकाळच्या सत्रात घेण्यात आला. यामध्ये १६ हजार ११४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ३१४ विद्यार्थी गैरहजर राहिले. परीक्षेदरम्यान भरारी पथकाने केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली. यात पाच विद्यार्थी गैरप्रकार करत असताना आढळून आले. भरारी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. परीक्षेत काॅपीला आळा बसावा, यासाठी विभागीय मंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर बैठे पथक, पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने - आण करणाऱ्या सहायक परिरक्षकांसोबत पोलिस कर्मचारी ठेवण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
२७५ विद्यार्थ्यांनी दिला वस्त्रशास्त्राचा पेपर...
शिक्षण विभागाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर इयत्ता १२वीची परीक्षा घेण्यात येत आहे. ७ मार्च रोजी वस्त्रशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात आला. या परीक्षेला २८७ पैकी २७५ विद्यार्थी उपस्थित होते, तर १२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ९५.८२ टक्के एवढे राहिले.