हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले
By विजय पाटील | Published: July 19, 2023 12:14 PM2023-07-19T12:14:22+5:302023-07-19T12:14:22+5:30
सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.परंतु या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
हिंगोली: पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून काही नागरिकांचे घरेही पडली आहेत. पहिल्यांदाच शहरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असली तरी जोरदार पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.
यावर्षी पाऊस जोरदार पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंतु जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे शेतकरीवर्ग पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. त्यातच १८ जुलै रोजी दुपारी दोन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. नदी, ओढे, नाले या पावसामुळे भरुन वाहत आहेत. १८ जुलैच्या मध्यरात्रीही जिल्ह्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. १९ जुलै रोजीही पावसाची संततधार सुरुच आहे.
संतधार पावसामुळे हिंगोली शहरातील गवळीपुरा भागात असलेल्या सैलानीबाबा चौकातील सोनूताई सूर्यभान चव्हाण या महिलेचे घर मंगळवारी रात्री झालेल्या पावसात कोसळले. यावेळी सोनूताई चव्हाण या महिलेच्या भावाचा मुलगा किरण चव्हाण आणि त्यांचा नातेवाईक ओमकार भास्कर खंदारे हे दोघेजण खोलीमध्ये झोपले होते. दरम्यान, त्यांच्या अंगावर घरावरील पत्रे आणि विटा पडल्या. भींत पडल्याचा आवाज कानी पडताच सर्वजण धावून आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.परंतु या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे महिलेचा संसार उघड्यावर आला आहे.
एकंदर हिंगोली शहरासह जिल्ह्यातील गोरेगाव, सेनगाव, वसमत, नर्सी नामदेव, कळमनुरी, कुरुंदा, औंढा, डिग्रस कऱ्हाळे, कनेरगावनाका, जवळाबाजार आदी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. सर्वच भागातील नदी, ओढे, नाले जोरदार पावसामुळे भरुन वाहत आहेत. तीन आठवड्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली त्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
कयाधू नदीला पहिल्यांदाच पूर...
यावर्षी जून महिना कोरडा गेल्यामुळे गावोगावी अन्नदान केले जात होते. मोठा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरीवर्गही चिंताग्रस्त होता. आषाढी एकादशीनंतर पावसाचा जोर वाढेल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्याप्रमाणे जुलै महिन्याच्या चौ्थ्या आठवड्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शहरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील ओढे, नालेही खळखळून वाहू लागले आहेत.