हिंगोलीत राडा, शेतकऱ्यांनी फोडले पिकविमा कंपनीचे कार्यालय

By विजय पाटील | Published: October 13, 2022 02:42 PM2022-10-13T14:42:10+5:302022-10-13T14:43:17+5:30

नुकसानीच्या बनावट सर्व्हेवरून शेतकरी संतापले

In Hingoli Rada, Farmers vandalized the office of crop insurance Company | हिंगोलीत राडा, शेतकऱ्यांनी फोडले पिकविमा कंपनीचे कार्यालय

हिंगोलीत राडा, शेतकऱ्यांनी फोडले पिकविमा कंपनीचे कार्यालय

Next

हिंगोली:  जिल्ह्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या परस्परच नुकसानीचा सर्वे करून बनावट स्वाक्षऱ्याद्वारे पंचनामे सादर केले जात असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. आमदार संतोष बांगर यांनीही शेतकऱ्यांसमवेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

जिल्ह्यातील तीन लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. शेतकऱ्यांचे 24 कोटी व शासनाचे मिळून 150 कोटींपेक्षा जास्त रक्कम पिक विमा कंपनीला प्रीमियम म्हणून मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पिक विमा कंपनीची टाळाटाळ असल्याचा प्रकार समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात न जाता थेट शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून पंचनामे केले जात आहेत. कृषी व महसुली विभागाचे संयुक्त पथक पाहणी साठी जात नाही. या सर्व तक्रारीनंतर आमदार संतोष बांगर यांनी कृषी व पिक विमा कंपनीची बैठक बोलावली होती. यात कृषी विभागाचे अधिकारी आले मात्र पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त शेतकरी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात पिक विमा कंपनीचा कार्यालयावर धडकले काही शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात कंपनीचे कार्यालय फोडले सर्व साहित्याची नासधूस केली.

कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा
पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक केल्याने कृषी विभागामार्फत या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली. या ठिकाणी उपस्थित कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना गुन्हा दाखल करावा असे आदेशित केले.

शासनाचे पंचनामे ग्राह्य धरले पाहिजे
आमदार संतोष बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही शेतकऱ्यांसह भेट घेतली. त्यांच्या कानावर घडला प्रकार घातला. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, या तक्रारी आमच्याही कानावर आले आहेत. याबाबत चौकशी लावली आहे संबंधितावर निश्चित कारवाई होईल. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतचे शासनाकडून करण्यात आलेले पंचनामे ग्राह्य धरण्यास कंपनीला भाग पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला जाईल.

Web Title: In Hingoli Rada, Farmers vandalized the office of crop insurance Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.