पीकविम्यासाठी हजारो शेतकरी कृषी कार्यालयावर धडकले; लेखी आश्वासनानंतर हटले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 06:48 PM2022-12-23T18:48:09+5:302022-12-23T18:49:02+5:30
विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.
हिंगोली : शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाल्यानंतरही पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर यात १५ दिवसांत संरक्षित रक्कम तसेच प्रलंबित १३.८९ कोटी देण्यााचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक मागे हटले.
सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची प्रचंड नासाडी झाली. उत्पन्न घटले. मात्र विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली. तर अनेकांना जुनाच विमा मिळाला नसताना नवीन विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दि. २३ डिसेंबर रोजी हिंगोली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर , माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर, भास्करराव पाटील , गजानन कावरखे , नामदेव पतंगे , परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामराव अडकिने, मधुकर जामठीकर, कैलास वाबळे, भागवत मुटकुळे आदींसह सेनगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मुख्य मार्गाने हा मोर्चा निघाला. तेथून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडकला.तेथे शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असता तुपकर , गोरेगावकर यांच्या शिष्टमंडळाशी जिल्हा कृषी अधिकारी व विमा कंपनी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली .