गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदाराने पोलीस ठाण्यातच घेतली ५ हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:32 IST2024-12-05T19:31:51+5:302024-12-05T19:32:07+5:30
वसमत ग्रामीण ठाण्याचा पोलिस हवालदार एसीबी पथकाच्या ताब्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदाराने पोलीस ठाण्यातच घेतली ५ हजारांची लाच
- इस्माईल जहागीरदार
वसमत : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करता प्रकरण मिटवून घेण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्विकारताना वसमत ग्रामीण ठाण्याच्या पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामीण पोलीस ठाण्यात रंगेहात पकडले. ही कारवाई ५ डिसेंबर रोजी वसमत येथे करण्यात आली. संजय दत्तात्रय गोरे असे लाच स्विकारणाऱ्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
वसमत पोलिस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरूद्ध अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जाची चौकशी पोलिस हवालदार संजय दत्तराव गोरे याच्याकडे होती. पोलिस हवालदार गोरे याने गुन्हा दाखल न करता प्रकरण मिटवून घेण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने २३ ऑक्टोबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ५ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वसमत ग्रामीण पोलीस ठाणे येथे सापळा रचला. त्यावेळी संजय दत्तात्रय गोरे याने पाच हजार रूपयांची लाच स्विकारताच पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, महंमद युनूस, विजय शुक्ला, तानाजी मुंढे, रविंद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजाराम फुपाटे, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, गजानन पवार, शेख अकबर, योगिता अवचार, शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली.