मध्यरात्री दुसऱ्याच्या घरासमोर पूजा मांडत लावला दिवा;करणीच्या तयारीतील महिलेस रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 11:37 AM2022-02-14T11:37:50+5:302022-02-14T11:39:03+5:30
अंधारात दुसऱ्याच्या घरासमोर पूजा मांडत दिवा लावल्याने सदरील महिलेला रंगेहात पकडत पाेलिसांच्या स्वाधीन केले.
आखाडा बाळापूर (हिंगोली) : मध्यरात्रीनंतर किर्रर्र अंधारात दुसऱ्याच्या घरासमोर पूजा मांडत दिवा लावला. परंतु ही पूजा मांडण्याचा प्रकार एका शेजाऱ्याने पाहिला आणि घरच्यांना माहिती दिली. घरचे बाहेर येताच, पूजा मांडताना संबंधित महिलेला रंगेहात पकडले. मग काय, त्या महिलेच्या विरोधात सारं गाव उठले, तिला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे १२ फेब्रुवारीला मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास एक महिला दुसऱ्याच्या घरासमोर किर्रर्र अंधारात पूजा मांडताना दिसली. दुसऱ्याच्या दरवाजासमोर हळद, कुंकू, तांदूळ असे पूजेचे साहित्य मांडत दिवाही पेटविला. ही पूजा सुरू असताना एक शेजारी लघुशंकेसाठी जागा झाला. त्याने हा प्रकार पाहताच, त्या घरमालकाला फोन करून माहिती दिली. घरातल्यांनी दरवाजा उघडून हा प्रकार पाहिला आणि पूजा करणाऱ्या महिलेला रंगेहात पकडले. यानंतर शेजाऱ्यांनी, गावातील इतरांनी एकच गर्दी करत, दुसऱ्याच्या अंगणात सुरू असलेली मध्यरात्रीची ही पूजा उघडी पडली. ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी ठाणेदार पंढरीनाथ बोथनापोड, पोउपनि. बालाजी पुंड, बीट जमादार मधुकर नांगरे, पंढरी चव्हाण दाखल झाले. पूजा करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले.
याप्रकरणी प्रियंका मंचकराव चव्हाण (रा. साळव) यांच्या तक्रारीवरून धुरपताबाई बेगाजी कदम (वय ६५, रा. साळवा) हिच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा अधिनियम २०१३ च्या कलम २ (सी), ३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत आरोपी महिलेने तक्रारदाराच्या घरासमोरील पायरीवर तक्रारदार व तिच्या कुटुंबातील लोकांवर करणी, भानामतीसारखी जादुटोणा करण्याच्या उद्देशाने पूजा मांडली म्हणून गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोनि. आम्ले करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शनिवारच्या मध्यरात्रीला ही पूजा जादुटोणा करण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.