रास्तारोको आंदोलनात ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने नर्सीफाटा दणाणला
By रमेश वाबळे | Published: September 9, 2023 05:43 PM2023-09-09T17:43:51+5:302023-09-09T17:44:32+5:30
मराठा समाजाला आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
बापूराव इंगोले
नर्सी नामदेव (जि.हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील हिंगोली ते सेनगाव रोडवरील बसस्थानक येथे सकल मराठा समाजबांधवांनी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रास्ता रोको केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निषेधार्थ ९ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नर्सी (नामदेव) येथील मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नर्सी, पहेनी, वैजापूर, केसापूर, कडती, हनवतखेडा, सरकळी, काळकोंडी, जवळा (बु), आमला, नांदुरा, गिलोरी, हळदवाडी व परिसरातील मराठा समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे’ आदींसह इतरही विविध घोषणा मराठा बांधवांनी देऊन सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला.
तसेच मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून तत्काळ आरक्षण देण्यात यावे, अंतरवाली सराटी येथील घटनेची चौकशी करून जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निलंबित करून योग्य ती कारवाई करावी. राज्याचे गृहमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मुकूल पोळेकर यांच्याकडे देण्यात आले.
नर्सी ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त...
येथील मुख्य रस्त्यावर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी नर्सी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, जमादार पांडुरंग डवले, शैलेश मुदिराज, शैलेश चौधरी, गजभार व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी काहीवेळ रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागली होती.