गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ५१ गुन्हेगार हद्दपार, तर २ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 02:56 PM2023-09-26T14:56:13+5:302023-09-26T14:56:44+5:30
वसमत पोलीसांनी घेतली दक्षता; २० जणांवर एमपीडीए अंतर्गत केली कारवाई
- इस्माईल जाहगीरदार
वसमत : गणेश विसर्जन दोन दिवसांवर आले असून त्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी दक्षता घेतली आहे. शहरातील ५१ गुन्हेगार प्रवृतीधारकांना तीन दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. तर २ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ झाल्याने छावनीचे स्वरूप आले आहे.
वसमत शहरात सण, उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलिसांनी दक्षता ठेवली आहे. २८ सप्टेंबर रोजी विसर्जन असून सर्व मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाने दक्षता घेतली आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीधारकांचे हद्दपार प्रस्ताव उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे सादर करत मंजुरी घेतली. २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ५१ जण तडीपार करण्यात आले आहेत. त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
तसेच शहरातील २० गुन्हेगार प्रवृतीधारकांवर ११० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोंघावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शहरात सण, उत्सव शांततेत साजरे व्हावे, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात मुख्य चौकासह १० ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांची १३ मानाचे गणपतीसह १०९ गणपती परीसरात पोलिसांची वाढती गस्त आहे. शहरात १५० पोलिस कर्मचारी व १० अधिकाऱ्यांच्या ताफ्याने छावनीचे स्वरूप आले आहे.
गणेशोत्सव शांततेत साजरे करा...
शहरात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी पोलिस प्रशासनाने घेत ५१ गुन्हेगार प्रवृतीधारकांना तीन दिवस शहरातून हद्दपार केले आहे. तर २० जणांवर कारवाई केली आहे. दोन जणावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हेगार प्रवृतीवर पोलिसांची करडी नजर आहे. संशयास्पद प्रकार दिसून आल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनास माहिती द्यावी.
- चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक, वसमत.