डासांचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:47+5:302020-12-24T04:26:47+5:30

पथदिवे पडले बंद बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील पथदिवे बंद पडले असल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...

The incidence of mosquitoes increased | डासांचा प्रादुर्भाव वाढला

डासांचा प्रादुर्भाव वाढला

Next

पथदिवे पडले बंद

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील पथदिवे बंद पडले असल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. पण अद्यापपर्यंत गावातील पथदिवे सुरू करण्यात आलेले नाही. रात्रीच्यावेळी गावात अंधार राहत असल्याने भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही गावामध्ये वाढले आहे. तसेच पथदिवे बंद असल्याने पायी चालणाऱ्यांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी गावातील पथदिवे सुरू करण्यात यावे अशी मागणी गावातून होत आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

हिंगोली : शहरातून जवळा पळशीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपले वाहन चालवितांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक खाजगी वाहनांत प्रवास करणाऱ्यांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. मागील तीन ते चार महिन्यात या रस्त्यावर एवढे खड्डे झाले की खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजेनासे झाले आहे. विशेष म्हणजे सकाळी सकाळी हिंगोली - खांबाळा या मार्गापर्यंत अनेक नागरिक माॅर्निंग वॉक करीत असतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा पाय घसरुन पडण्याच्या घटना घडत आहेत.

शहरात शेकोट्या वाढल्या

हिंगोली : मागील चार दिवसांमध्ये थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. रात्री आठ वाजल्यानंतर थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी या थंडीपासून आपला बचाव व्हावा तसेच अंगाला उब मिळावी यासाठी शहरातील अनेक नगरांसह चौकांमध्ये नागरिक शेकोट्या करीत आहेत. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी थंडीच्या वातावरणात शेकोटी करणाऱ्यांची संख्या थंडीबरोबरच वाढली आहे.

वाहतुकीस अडथळा

हिंगोली : शहरातील गांधी चौकासह भाजी मंडईमध्ये अनेक फळविक्रेत्यांसह इतर किरकोळ व्यापारी आपले हातगाडे रस्त्यांच्या मधोमध लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. हप्त्यांतून दोन ते तीन दिवस शहर वाहतूक पोलिसांच्या नियमांचे पालन होत असते. पण उर्वरित हप्त्याच्या पाच ते चार दिवसात अनेक फळविक्रेते व इतर किरकोळ व्यापारी आपले हातगाडे रस्त्यात लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. यामुळे वाहनधारकांना याठिकाणाहून वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अव्वाच्या सव्वा प्रमाणे भारनियमन

आंबाचोंडी : वसमत तालुक्यातील आंबाचोंडी गावात सध्या भारनियमनाच्या नावाखाली वीजपुरवठा जास्त प्रमाणात खंडित करण्यात येत आहे. गावातील वीज भारनियमन दुपारी १२ ते ६ असे तब्बल सहा तासासाठी खंडित करण्यात येत आहे. साधारणता गावात जास्तीत जास्त चार तास भारनियमन लागू व्हावे अशी गावकरी मागणी करीत आहे. दिवसा सहा तास वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतर रात्रीच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यासाठी भारनियमन चार तास लागू करावे व नंतर वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

रस्त्याचे काम रखडलेले

हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथून जाणाऱ्या परभणी या राज्य महामार्गाचे काम मागील पाच महिन्यांपासून रखडलेले आहे. रस्त्याच्या ठिकाणी व्यवस्थित नालीचे बांधकाम करण्यात येण्याची मागणी गावकऱ्यांनी याठिकाणी केली असता तेव्हापासून या राज्य महामार्गाचे काम रखडले आहे. त्यासाठी आता नालीचे व्यवस्थित बांधकाम करुन या राज्य महामार्गाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी हट्टासह परिसरातून होत आहे.

गावात वन्य प्राण्यांचा त्रास वाढला

डिग्रस कोंढुर : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढुर गावामध्ये वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. गावाच्या शेतशिवारात सध्या हरभरा, हळद, गहू या पिकाची लागवड करण्यात आली आहे. पण या पिकावर वानर, हरिण, रोही, रानडुक्कर आदी वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर हल्ला करीत या पिकांची नासाडी करीत आहेत. वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे. यासाठी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी शेतशिवारातील शेतकरी करीत आहेत.

Web Title: The incidence of mosquitoes increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.