हिंगोलीत गोठे-घरे पेटवून दिल्याच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:01 AM2018-04-18T01:01:42+5:302018-04-18T01:01:42+5:30
शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत तीन गुरे होरपळून जखमी झालीे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत तीन गुरे होरपळून जखमी झालीे आहेत.
बावनखोली येथील घराबाहेरील वस्तू, जनावरांचे गोठे पेटवून देण्याच्या घटना मागील दहा दिवसांपासून घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. १६ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बावनखोली येथील दुग्ध व्यवसायिक गोपाल गायकवाड यांचा गोठा कोणीतरी पेटवून दिला. जनावरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांना वेळीच जाग आली. गायकवाड व त्यांच्या पत्नीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे गुरे वाचली व अधिक नुकसान टळले. परंतु गोठ्यातील जनावारांचा कडबा व इतर साहित्य जळून खाक झाले. याचदरम्यान गायकवाड यांच्या घरापासून काही अंतरावरच शेख रशीद शेख हमीद यांचाही कटलरीचा हातगाडा पेटवून दिल्याचे लक्षात आले. आगीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे.
अशोक गादेकर यांच्या घरासमोरील खुर्च्या तर संजय इंगोले यांच्या घराला व गोठ्यासही आग लावण्याची घटना घडली होती. मागील दहा दिवसांत घरे, गोठे व बाहेरील वस्तू पेटवून देण्याच्या पाच घटना घडल्याचे नागरिक सांगत होते. वाढत्या घटनांमुळे अखेर नागरिकांनी पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार अर्ज दिला.
केवळ ठरावीक भागातच घडत असलेल्या घटनांमुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. त्यामुळे पोलिसांना या घटनेच्या मुळाशी जाण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. तर या प्रकरणाचा तपासही गांभिर्याने न झाल्यास मोठा धोका उद्भवू शकतो.
पोलिसांनी मंगळवारी १२.३० वाजता बावनखोली परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी गोठ्याचा पंचनामा पोलिसांनी केला. परंतु घरे, गोठे व घराबाहेरील वस्तंू कोण पेटवून देत आहे,याचा उलगडा मात्र झाला नाही. जाळपोळीच्या या घटना कोण घडवून आणत आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सदर घटनेची नोंद ठाण्यात करण्यात आली असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले. या प्रकारामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.