कोल्हापुरी साखळी बंधाऱ्याच्या गेटची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:58+5:302020-12-23T04:25:58+5:30
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील सेनगाव हिंगोलीदरम्यान वाहत असलेल्या कयाधू नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी साखळी बंधाऱ्याची सिंचनासाठी निर्मिती करण्यात आली ...
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील सेनगाव हिंगोलीदरम्यान वाहत असलेल्या कयाधू नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी साखळी बंधाऱ्याची सिंचनासाठी निर्मिती करण्यात आली आहे. या साखळी बंधाऱ्यावर सर्वच ठिकाणी अपूर्ण गेट बसविल्याने पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे.
कयाधू नदीवर सेनगाव, ब्रह्मपुरी, जांभरून, गीलोरी, घोटा, ईडोळी, बेलवाडी आदी ठिकाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून साखळी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
मात्र काही ठिकाणी गेटची संख्या कमी झाल्याने उंची कमी, पाणी साठवणूक क्षमता निम्म्यापेक्षा कमी झालेली दिसून येत आहे.
ब्रह्मपुरी येथील साखळी बंधाऱ्याची १०८ गेटची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात ३० गेट बसविण्यात आले. साठवणूक क्षमता १३६ टीसीएम, सद्यस्थितीत केवळ ४० टीसीएम,
गीलोरी येथील ११५ गेटची क्षमता आहे. मात्र या ठिकाणी ६२ गेट बसविण्यात आले तर येथील साठवणूक क्षमता १३७ टीसीएम, सद्यस्थितीत केवळ ४५ टीसीएम साठवणूक आहे.
घोटा देवी येथील बंधाऱ्याची एकूण १४४ गेटची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी ७२ गेट बसविण्यात आले आहेत.
येथे १४० टीसीएम साठवणूक क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ ६० टीसीएम एवढेच पाणी साठवणूक झाले आहे.तर उर्वरित साखळी बंधाऱ्याची सुद्धा हीच अवस्था आहे.
बंधाऱ्यांची निर्मिती होऊन दोन वर्ष होत आहेत. मात्र अजूनही बंधाऱ्यास पूर्ण गेट बसवण्यात आले नाहीत.
येथील बंधाऱ्यावर क्षमतेप्रमाणे पूर्ण गेट बसवल्यास गेटची उंची वाढविल्यास साठवणूक क्षमतेमध्ये वाढ होऊन याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग घेता येईल. तसेच परिसरातील पाणीपातळीमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
सदरील बंधाऱ्यावर गेटची क्षमता असताना गेट कमी प्रमाणात का बसवण्यात आले आहे असे विचारले असता याविषयी लातूर येथील गुत्तेदाराला उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांना अनेकवेळा लेखी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे जलसंधारण अधिकारी व्ही.डी.शिंदे यांनी सांगितले.
फोटो नं. ६