पुन्हा १५ दिवसासाठी वाढविली टाळेबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:33+5:302021-05-01T04:28:33+5:30
हिंगोली : जिल्ह्यात १ मेपर्यंत आधीच टाळेबंदी लागू होती. आता त्याचा कालावधी १५ मेपर्यंत वाढविण्यात आला असून, ...
हिंगोली : जिल्ह्यात १ मेपर्यंत आधीच टाळेबंदी लागू होती. आता त्याचा कालावधी १५ मेपर्यंत वाढविण्यात आला असून, कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत. यामध्ये ई-कॉमर्स व कृषीशी संबंधित काही दुकानांना तेवढी शिथिलता दिली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्यामुळे २५ एप्रिलच्या दुपारी १ वाजतापासून ते १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यातील जवळपास बाबी कायम ठेवून आता १५ मेपर्यंत संचारबंदी व टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते ९ या वेळात दूध विक्री केंद्र सुरू ठेवता येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील बाजार समित्या, कृषी संबंधित सर्व दुकाने जसे खते, बियाणे, कृषी साहित्य अवजारे, गॅरेज, टायर विक्री व दुरुस्ती दुकाने, मोंढा आदी दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहतील.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
असा आहे आदेश
किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते, कृषी दुकाने, शेतमाल, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्ण साहित्य विक्रेते यांची दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.
कोविड-१९ संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून इतर शासकीय कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढे कर्मचारी उपस्थित राहतील. १५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित ठेवणे आवश्यक असल्यास परवानगी घ्यावी लागणार आहे. अत्यावश्यक सेेवेसंबंधित प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीतकमी ठेवावी. परंतु, १०० टक्क्यापर्यंत आवश्यकतेनुसार ठेवता येणार आहे.
लग्नसोहळे केवळ नोंदणी पद्धतीने पार पाडता येतील. अन्य कोणत्याही ठिकाणी लग्नसोहळे आयोजित करण्यास प्रतिबंध असणार आहेत.
अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी खासगी प्रवासी वाहतूक ५० टक्क्याच्या मर्यादेपर्यंत प्रवास करता येईल. मात्र, जिल्हाअंतर्गंत किंवा शहरात प्रवास करता येणार नाही.
वैद्यकीय कारणासाठी किंवा अंत्यविधी, गंभीर आजारी व्यक्तीसाठी परवानगी घेऊन प्रवास करता येणार आहे. मात्र, नियमाचे उल्लंघन केल्यास १० हजाराचा दंड लावण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एसटी आगारातील सर्व बसेस बंद राहतील. मात्र, इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस केवळ शासकीय बसस्थानकात थांबतील.
केवळ शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी बँका सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, नागरिकांच्या व्यवहारास बंदी असेल.
नोंदणीकृत उद्योग सुरू ठेवण्यासाठी, कर्मचारी, कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी तहसीलदारांकडून ओळखपत्र घेणे आवश्यक असणार आहे.
सह दुय्यम निबंधक वर्ग १ व २ ही कार्यालये केवळ कार्यालयीन कामकाज करण्यासाठी चालू राहतील.