दुष्काळावर मात करत पपई लागवडीतून मिळवला भरघोस नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:42 PM2018-12-22T12:42:07+5:302018-12-22T12:42:42+5:30

यशकथा : पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

Increasing profit from papaya cultivation by overcoming the drought | दुष्काळावर मात करत पपई लागवडीतून मिळवला भरघोस नफा

दुष्काळावर मात करत पपई लागवडीतून मिळवला भरघोस नफा

Next

- रामदास टाले (खुडज, जि. हिंगोली) 

खुडज येथील शेतकरी अरुण माधवराव टाले (२९) या तरुण शेतकऱ्याने दुष्काळावर मात करीत पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

सोलापूर येथील खाजगी नर्सरीतून मार्च २०१८ मध्ये तायवान ७८६ पपईची प्रतिझाड १२ रुपयांप्रमाणे २ हजार रोपे खरेदी केली. नर्सरी चालकाने घरपोच रोपे आणून दिली. ८ बाय ६ फूट अंतरावर बेड तयार करून ठिबकवर रोपांची लागवड केली. दोन एकरासाठी रोपे व ठिबक मिळून ८० हजारांचा खर्च झाला. ठिंबकद्वारे पाण्याचे योग्य नियोजन ठेवत, पाण्यात विरघळणाऱ्या खते, सूक्ष्म पोषकद्रव्ये ठिबकद्वारे दिली. त्यानंतर पपईची झाडे वाढीस लागली

अन् १ जून रोजी गारपिटीने पपईची बाग झोडपून निघाली. गारपिटीने बागेचे मोठे नुकसान झाले. एकही पान झाडावर शिल्लक नव्हते. तरीही अरुणने परिश्रमातून जिद्दीने बाग उभी केली. त्याच्या जिद्दीसमोर शेवटी निसर्गालाही हात टेकावे लागले. ते संकट दूर झाले आणि दुष्काळाच्या संकटाने तोंड वर काढले. विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठल्याने बागेसाठी पाणी पुरेल का? हा प्रश्न सतावू लागला. परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. बागेला पाणी देण्यासाठी ठिबकची व्यवस्था असल्याने या संकटावरही अरुणने मात केली.

बागेला एक दिवसाआड दोन ते तीन तास पाणी दिले जाते. याउलट मोकळे पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय जमिनीतील पोषकद्रव्येही वाहून जातात. जमीन नापिक बनण्याचे हेच मुख्य कारण असल्याचे अरुण सांगतो.
लागवडीनंतर १५ दिवसाला ठिबकद्वारे १ किलो ह्युमिक अ‍ॅसिड व १९:१९:१९ हे पाण्यात विरघळणारे खत २५ किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. त्यानंतर १३:४०:१३ हे खत १० किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. फळांची योग्य वाढ झाल्यानंतर फळाला रंग येण्यासाठी ०:५२:३४ व ०:०:५० हे खत १५ किलो आठ दिवसांच्या अंतराने देण्यात येत आहे.

सद्य:स्थितीत पपईची बाग बहरली असून, एका झाडावर ७० ते ८० पपई लगडल्या आहेत. एका झाडावरील वजन साधारणत: एक ते दीड क्विं टलपर्यंत आहे. पहिल्या तोडणीत व्यापाऱ्यांनी जागेवरच १२ रुपये प्रतिकिलोने तीन टन पपई शेतातूनच खरेदी केली. दुसऱ्या तोडणीला ८ टनांपर्यंत पपई निघणार असून, १५ रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची अपेक्षा अरुणने व्यक्त केली आहे. पाणी शेवटपर्यंत टिकले तर  शेवटची तोडणी जून महिन्यापर्यंत चालू शकते, तर ५० ते ६० टनांपर्यंत उत्पन्न शेवटपर्यंत मिळणार आहे. यातून ७ ते ८ लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा टाले यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबत केळी, हळद, हरभरा या पिकांतून १० लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे अरुण सांगतो. 

दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडल्याने पारंपरिक शेतीवर याचा गंभीर परिणाम होत आहे.  कधी-कधी तर सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर या पिकांतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्याचे अरुण सांगतो.

Web Title: Increasing profit from papaya cultivation by overcoming the drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.