सिंचन अनुशेषासाठी कयाधू नदीपात्रात संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 04:54 PM2022-01-20T16:54:39+5:302022-01-20T16:55:23+5:30
आंदोलकांनी प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याची भूमिका घेतली आहे
कळमनुरी ( हिंगोली ) : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात यावा, कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, सापळी धरण रद्द करावे, जिल्ह्याला सिंचनासाठी निधी द्यावा, ईसापूर धरणातील पाणी तालुक्याला देण्यात यावे, खरबी बंधारा रद्द करावा आदीं मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्यासह अनेकजण सालेगाव येथील कयाधू नदीपात्रात आज सकाळी १० वाजेपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. परिसरातील गावातील ग्रामस्थांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, तसेच खरबी येथे बंधारा बांधून त्याचे पाणी इसापूर धरणात सोडू नये, सापळी धरण रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. माजी खासदार माने यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून परिसरातील दोन गावातील नागरिक दररोज साखळी उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
याप्रसंगी हरिभाऊ झाकलवाडे, डिगांबर कदम, दादाराव मुंडे, सदाशिव चौतमल, वसंतराव पतंगे, रामकिशन ठाकूर, शेषराव पतंगे, गजानन काळे, राम पाटील, जनार्धन गुठ्ठे, आनंद डाढाळे, शिवाजी काळे, शिवाजी गुठ्ठे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. दरम्यान, शासनाकडून जोपर्यंत ठोस उपाययोजना हाती घेतल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुचं राहणार असल्याचे आंदाेलनकर्त्यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याचा निर्णय
सिंचनाच्या बाबतीत हिंगोली जिल्ह्यावर वेळोवेळी अन्याय केला जात आहे. सिंचन अनुशेष असतांनाही बंधाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत. एकीकडे बंधारे बांधले जात नाही तर दुसरीकडे कयाधूचे पाणी खरबी बंधारा बांधून इसापूर धरणात सोडण्याचे प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरु आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होईल. शासनाने सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, या मागणीसाठी बेमुद्दत उपोषण सुरु आहे. निर्णय झाला नाही तर प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्यात येणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.