महागाईची हद्द झाली, खताचे दर शंभर ते अडीचशे रुपयांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:38+5:302021-03-10T04:30:38+5:30
हिंगोली : खत उत्पादन कंपन्यांनी १ मार्चपासून खताच्या दरात वाढ केली आहे. खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले ...
हिंगोली : खत उत्पादन कंपन्यांनी १ मार्चपासून खताच्या दरात वाढ केली आहे. खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असली तरी उत्पन्न मात्र तेवढेच राहात असल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहात आहे.
खत उत्पादक कंपन्यांनी १ मार्चपासून खताच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खताच्या दरात १०० ते २५० रुपयांनी वाढ होणार आहे. रब्बी हंगामातील पिके जवळपास काढणीला आली आहेत. आता खरिपाच्या तयारीला शेतकरी लागले असून, आतापासूनच शेतीची मशागत करीत आहेत. तसेच खत, बियाण्यांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. मात्र, आता खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. खताच्या जुन्या साठ्याला दरवाढ लागू नसली तरी अनेक ठिकाणी जुन्या साठ्यातील खत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून येत आहेत. नवीन खताची रॅक शक्यतो मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यात लागत असते, असे बोलले जात आहे. त्यानंतरच नवीन खताचा साठा उपलब्ध होतो. त्यावेळी मुबलक खत उपलब्ध झाले, तरीही शेतकऱ्यांना जादा रक्कम देऊनच खत खरेदी करावी लागणार आहे.
इंधन दरवाढीचा परिणाम
मागील महिनाभरापासून इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच आहेत. याचा परिणाम खताच्या उत्पादन खर्चावरही होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच खताचे दर वाढले असून, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार असल्याचे चित्र आहे.
डिझेल दरवाढीने मशागतही महागली
डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. गतवर्षी नांगरणी ११०० रुपये प्रतिएकर होती. ती आता १२०० रुपये झाली आहे. तसेच रोटावेटर ८०० वरून १ हजार रुपये, खुरटणी ६०० वरून ७०० रुपये, पेरणी ५०० वरून ७०० रूपये दर झाले आहेत. डिझेल दरवाढीचाही फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. उत्पादन खर्च वाढला असला तरी उत्पन्न मात्र तेवढेच राहात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे.
प्रतिक्रिया
मागील पूर्ण वर्ष कोरोनाच्या संकटात गेले. शेतीसोबत सगळेच व्यवसाय अडचणीत आले. शेती उत्पादन निम्म्यावर आले असून, जीवनावश्यक वस्तूंसोबत आता खतांचे दरही वाढले आहेत. खताची दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही.
- ज्ञानदेव खराटे, कौठा
शेतीशी निगडीत सगळ्याच बाबींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समीकरण बिघडत चालले आहे. डिझेल भाववाढीमुळे मशागत करताना अडचण येत असून, खर्च व उत्पादन यांचा कसा मेळ बसवावा, हेच समजत नाही.
तुकाराम भूतनर, धामणगाव
डिझेल दरवाढीमुळे मशागतींचे दर वाढले आहेत. त्यात खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाला पुरेसा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणितच कोलमडले आहे.
- देविदास माखणे, साळवा
खताचा प्रकार आधीचे दर आताचे दर
१०-२६-२६ ११०० १२५०
१२-३२-३२ ११०० १२००
२४-२४-० १२५० १४००
एसएसपी ३१० ३८०
डीएपी १२०० १३०० ते १३५०