५९ हजार कुटुंबांची माहिती आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:26 AM2019-02-21T00:26:11+5:302019-02-21T00:26:33+5:30
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या निकषपात्र शेतकऱ्यास वार्षिक सहा हजारांची पेन्शन शासन देणार आहे. ती टप्प्या-टप्प्याने देणार असले तरीही त्यासाठीची माहिती आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. महसूल, कृषी व जि.प.च्या यंत्रणेमार्फत हे काम केले जात आहे. आज जिल्हाभर महसूल विभागाने या कामाकडे लक्ष केंद्रित केले होते. मात्र यात कळमनुरी वगळता इतर कोणत्याच तालुक्याला १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. यात माहिती चुकीची झाल्यास अथवा कुणाचे नाव राहिल्यास आक्षेप व हरकती घेण्याचीही मुभा आहे. मात्र आधीच काटेकोर तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्ह्यात नमुना ८ अप्रमाणे खातेदार शेतकरी ३.४३ लाख आहेत. मात्र ७0२ गावांतून परिशिष्ठ अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संभाव्य संख्या १ लाख ४५ हजार ६९९ आहे. यात सोबतच फेरतपासणीही होत असल्याने कुटुंबसंख्या वाढण्याचीही शक्यता आहे. कळमनुरीत त्यामुळे १८ हजारांवरून २१ हजारांपर्यंत कुटुंबसंख्या गेली. या तालुक्यात १४८ पैकी १३७ गावांचे अपलोडींगचे काम पूर्ण झाले आहे. अजून ११ गावे बाकी आहेत. हा तालुका जिल्ह्यात आघाडी कायम ठेवून असल्याचे दिसत असून काम अंतिम टप्प्यात आहे.
श्रेयासाठी धडपड
भाजप सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत पेन्शनचा पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यावर टाकून श्रेय घेण्यासाठी अतिशय घाईत हे काम पूर्ण करून घेतले जात आहे. तर आपल्या माहितीत चुका राहू नये म्हणून लोकांची तहसीलपर्यंत गर्दी होत असल्याचे दिसते.
हिंगोली तालुक्यात संभाव्य कुटुंबांची संख्या ३0 हजार असून ७0 गावांतील ६७0८ कुटुंबांची माहिती अपलोड झाली. सेनगावात २७ हजार संभाव्य कुटुंबांपैकी ९0 गावांतील ९४0८, वसमतला ५६ हजार संभाव्य कुटुंबांपैकी १0५ गावांतील १२ हजार ९३३, औंढ्यात संभाव्य १३ हजार कुटुंबांपैकी ७६ गावांतील ९0४0 कुटुंबांची माहिती एनआयसीवर अपलोड झालेली आहे. आतापर्यंत ४७८ गावांतील कुटुंबाच्या माहिती अपलोड करण्याचे काम झाले असले तरीही २२४ गावांतील माहिती अपलोड करण्यास प्रारंभही नसल्याचे दिसत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मानचे काम करण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. रात्रंदिवस अपलोडिंगचे काम केले जात आहे. वरिष्ठांकडून सकाळपासूनच तगादा होत असल्याने प्रशासन हैराण आहे.