मिशन वात्सल्य योजनेसाठी माहिती संकलित करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:19+5:302021-09-24T04:35:19+5:30
हिंगोली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या प्रत्येक बालकाला, तसेच विधवा महिलांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ देण्यासाठी तालुका स्तरावरून ...
हिंगोली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या प्रत्येक बालकाला, तसेच विधवा महिलांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ देण्यासाठी तालुका स्तरावरून माहिती संकलित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा कृती दलाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा कृती दल समन्वयक सरस्वती कोरडे, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बालकांना शालेय पुस्तके, गणवेश मिळतो का याची माहिती घ्यावी, प्रत्येक बालकांच्या शाळेची शुल्क, गणवेश, पुस्तके घेण्यासाठी अनुज्ञेय लाभ देण्यात यावा, विषयावर प्रशिक्षण देण्यात यावे, आदींबाबत सूचना देण्यात आल्या.
आढावा बैठकीत कोरोनामुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या १४५ बालके असल्याची माहिती दिली. एक पालक गमावलेली बालके १४२ असून, त्यात आई गमावलेली बालके १७, वडील गमावलेली बालके १२५ आहेत, तर दोन्ही पालक गमावलेली बालके तीन आहेत. १४२ बालकांचे जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सामाजिक तपासणी अहवाल पूर्ण करून त्यांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आला.