'...तर गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही'; प्राचार्यांना मारहाणीचे आ. संतोष बांगरांकडून समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 03:34 PM2023-01-25T15:34:39+5:302023-01-25T15:36:33+5:30
सरकारमध्ये असल्याने आवाज उठवायचा नाही अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण नाही.
हिंगोली: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलेवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही. सत्तेत आहोत अन्यायविरोधात आवाज उठवायचा नाही का? हातात बांगड्या घातल्या नाहीत. गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांना मारहाणीचे समर्थन करताना आमदार संतोष बांगर यांनी दिली.
व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्राचार्य आणि उपप्राचार्यांना विचारा हे का घडले ? त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले तर मी चुकलो मान्य करेल. त्यांनी का तक्रार दिली नाही ? व्हिडीओ व्हायरल झाला आहे, याची शहानिशा करून माध्यमांनी बोलावे, असे आवाहन आ. बांगर यांनी केले. तसेच सरकारमध्ये असल्याने आवाज उठवायचा नाही अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण नाही. हातात बांगड्या घातल्या नाहीत. मी शिवसैनिक आहे. अन्याय विरोधात आवाज उठवणे कर्तव्यच. महिलेवर अन्याय सहन करून घेणार नाही, त्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही. याप्रकरणी डीसीएम यांना सर्व माहिती दिली आहे. महिलेच्या इज्जतिचा प्रश्न होता म्हणून शांत आहे, नसता त्याच दिवशी प्राचार्य आणि उपप्राचार्यांवर गुन्हा दाखल केला असता, असेही आ. बांगर म्हणाले.
सत्तेत बसलेल्या आमदारांकडून मारहाण, राष्ट्रवादीची टीका
शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांकडून होतात. भाजपच्या आमदारांकडून अशा घटना वारंवार होत आहेत. सत्तेत बसलेले आमदार मारहाण आणि बळजबरी करतायत अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी माहिती घेऊन कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण
आमदार संतोष बांगर त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. कधी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यास मारहाण तर कधी अधिकाऱ्यास फोनवरून धमकावणे, अशा घटना सातत्याने पुढे आल्या आहेत. यावेळीही व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार बांगर एका कार्यालयात असून समोरील व्यक्तीस चोप देत असल्याचे दिसत आहे. ही घटना मागील आठवड्यातील असून हा व्हिडीओ हिंगोली येथील तंत्रनिकेतनमधील आहे. येथील प्राचार्यांच्या विरोधात महिला प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. यावरून आ. बांगर प्राचार्यांच्या कार्यालयात पोहचले. यावेळी प्राचार्यांवर आ. बांगर यांनी हातउचला.