कृषी विभागाकडून दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:28 AM2021-05-22T04:28:07+5:302021-05-22T04:28:07+5:30
हिंगोली : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील काही भागात खते मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी ...
हिंगोली : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील काही भागात खते मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांनी हिंगोलीत काही दुकानांची तपासणी करून शेतकऱ्यांना योग्य भावात बी-बियाणे व खतांची विक्री होत आहे की नाही, याची तपासणी केली.
खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी बी-बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच शासनाने खतांचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. शिवाय जुन्या दरातील खते नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत होते. त्यात काही ठिकाणी खते नसल्याचे सांगत असल्याच्या तक्रारीही कृषी विभागाकडे येत होत्या. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून खत दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली होती. जेथे खत आहे, तेथेही असा प्रकार घडत असल्याने अशांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तंबी देत शेतकऱ्यांना उपलब्ध साठा देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
शुक्रवारी बाजारपेठेत पुन्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनीच तपासणी केली. या तपासणीत त्यांनी विविध दुकानांवर जाऊन बी-बियाणे, खते आदींच्या साठ्याबाबत माहिती घेतली. त्यातच काही दुकानांमधून बियाणे व खतांच्या साठ्याचे नमुनेही घेण्यात आले. तसेच भावफलक दर्शनी भागात लावावे, प्रमाणित बियाणेच विकावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.