मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज वाटपाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:16 AM2018-12-18T00:16:18+5:302018-12-18T00:17:19+5:30
मुद्रा बँक योजने अंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पात्र कर्ज मंजूर करण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुद्रा बँक योजने अंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पात्र कर्ज मंजूर करण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी अशासकीय सदस्य माजी. आ. गजानन घुगे, सुरजितसिंग ठाकूर, बाबाराव घुगे, भारत लोखंडे, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलावार, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक शांताराम सौदल्लू, आरसीटीचे संचालक प्रवीण दीक्षित, आणि मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की जिल्ह्यातील बँकांना शिशु, किशोर आणि तरुण गटनिहाय मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज वितरणाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पुर्ण करुन लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. काही बँकानी चांगले काम केले असून इतर बँकांनी उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देऊन स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी प्रयत्न लाभार्थ्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी यावेळी दिल्या.
सर्व बँक व्यवस्थापकांनी मुद्रा बँक योजने अंतर्गत प्राप्त झालेली प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा असे सर्व अशासकीय सदस्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समितीवर निवड झालेल्या सर्व अशासकीय सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीस सर्व बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती. यावेळी मुद्रा बँक योजनेची माहिती सादर करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी यांनी माहिती सादर केली. यामध्ये मुद्रा बँक योजने अंतर्गत १५ डिसेंबर पर्यंत शिशु गटात २३६३ लाभार्थ्यांना ५ कोटी ६२ लाख रुपये, तसेच किशोर गटामध्ये ७९३ लाभार्थ्यांना १९ कोटी ६३ लाख रुपये आणि तरुण गटात १९७ लाभार्थ्यांना १४ कोटी ४१ लाख असे एकुण ३,३५३ लाभार्थ्यांना ३९ कोटी ६६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.