विसर्जनापूर्वीच अस्थींवर पाणी सोडून विटंबना; हिंगोली जिल्ह्यातील सेनगावातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 02:14 PM2020-09-14T14:14:00+5:302020-09-14T14:24:54+5:30
द्वेष भावनेतून करण्यात आलेल्या या कृत्याचा प्रकार माणुसकी हेलावून टाकणारा होता.
सेनगाव (जि. हिंगोली) : सार्वजनिक स्मशानभूमीची अडचण असलेल्या सेनगाव शहरात रविवारी अंत्यसंस्कार केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थींची विसर्जनापूर्वीच अज्ञात इसमाकडून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून विटंबना करण्यात आली. अंत्यसंस्कारस्थळी पाण्याचा डोह केल्याने समाजबांधव आक्रमक झाले. हे गैरकृत्य करणाऱ्याविरूद्ध कारवाई करा, अशी मागणी करत आक्रमक नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही सेनगाव शहरातील स्मशानभूमीची समस्या कायम आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मिळेल, त्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. शहरातील पांडुरंग राऊत यांचे ११ सप्टेंबरला निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर समाजबांधवानी नियोजित स्मशानभूमीच्या जागेवरच अंत्यसंस्कार केले. रविवारी त्यांचा रक्षा सावडण्याचा दिवस होता. मयताचे कुटुंबिय, सर्व नातेवाईक, मित्र परिवार जेव्हा सावडण्याचा विधी करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्याठिकाणी पाणी सोडल्याने अस्थी वाहून गेल्या तर काही पाण्यावर तरंगताना दिसून आल्या. त्यामुळे हा प्रकार पाहून सावडण्याच्या विधीसाठी आलेल्यांमध्ये संताप व्यक्त झाला.
द्वेष भावनेतून करण्यात आलेल्या या कृत्याचा प्रकार माणुसकी हेलावून टाकणारा होता. त्यामुळे विधी न करताच हा जमाव संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सेनगाव पोलीस ठाण्यावर धडकला. दोषीविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. जमाव ठाण्यात ठाण मांडून बसला होता.
आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमाव मार्गस्थ
पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर यांनी जमावाच्या भावना जाणून घेत शांत राहण्याचे आवाहन केले. घटनास्थळी पंचनामा करून दोषीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी गजानन पांडुरंगअप्पा राऊत यांच्या फिर्यादीवरून तुकाराम परसराम फटांगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर जमाव मार्गस्थ झाला. यासंबंधी झालेल्या प्रकाराबद्दल शंभराहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदनही देण्यात आले आहे. दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.