आश्वासने पूर्ण न झाल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:30 AM2021-04-21T04:30:11+5:302021-04-21T04:30:11+5:30
हिंगोली : वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोरोनाच्या रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ...
हिंगोली : वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोरोनाच्या रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. तान्हाजी मुटकुळे यांनी सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तूर्त मागे घेतले आहे. मात्र चार दिवसात सुधारणा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
औषधी, इंजेक्शनचा तुटवडा, अपुरे मनुष्यबळ, स्वच्छतेचा अभाव, शुद्ध पाणीपुरवठ्याचे बंद पडलेले फिल्टर सुरू करणे आदी मागण्यांसाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्यासह माजी आ. गजानन घुगे, के. के. शिंदे, हमिद प्यारेवाले, कोटकर, हरिश्चंद्र शिंदे, प्रशांत सोनी, संजय कावडे, संजय ढोके, मोतीराम इंगोले आदींनीही जिल्हा कचेरीसमोर उपोषण केले. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, प्रशासनाची प्रत्येक बाबतीत कुचकामी भूमिका आहे. गर्दी टाळण्यासाठीचे उपाय व्यवस्थित होत नाहीत. रोज किराणा कुणाला लागतो? मात्र तरीही या नावाखाली रस्त्यावर गर्दी आहे. यापूर्वीही संचारबंदीत अशीच गर्दी होत होती. प्रशासनाने यावर नियंत्रण आणले पाहिजे. कोरोना रुग्णालयात असुविधांचा सामना करावा लागू नये म्हणून निधी देण्याचीही तयारी आहे. मागच्या वेळी ५० लाख रुपये व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन आदींसाठी दिले होते. त्याचे काय केले? हे सुद्धा प्रशासनाला सांगता येत नाही. यावरही प्रशासनाला जाब मागायची आता वेळ आली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी गैरसोयींबाबत कबुली दिली. तर त्या दूर करण्यासाठी आजपासूनच प्रयत्न सुरू करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र चार दिवसात यावर निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असेही आ. मुटकुळे म्हणाले.