प्रखर ऊन, संचारबंदीही नागरिकांचे फिरणे थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:29 AM2021-04-21T04:29:57+5:302021-04-21T04:29:57+5:30
हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर नागरिकांना अटकाव करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने मोक्याच्या ठिकाणी बांबू ...
हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर नागरिकांना अटकाव करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने मोक्याच्या ठिकाणी बांबू लावून रस्ते अडवून ठेवले आहे. असे असताना नागरिक प्रखर उन्हातही मेडिसीन, किराणा व भाजीपाल्याचे कारण देत रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत.
१४ एप्रिलच्या रात्रीपासून पंधरा दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे. जे नागरिक विनाकारण विनामास्क बाहेर पडतील त्याची अँटिजेन तपासणी करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे, एवढेच नाही तर नगरपरिषदेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांना दंडही लावला जात आहे तरीही काही लोक प्रखर उन्हाची पर्वा न करता मेडिसीन, किराणा, भाजीपाला, दवाखान्यात जायचे आहे, असे जुजबी न पटण्यासारखे कारण देत रस्त्याने विनाकारण आणि विनामास्क फिरताना दिसत आहेत. फिरणाऱ्यांचे कारण खरे असेल तर त्यास सोडून दिले जात आहे परंतु, कारण जर पटण्यासारखे नसल्यास त्यास नांदेड नाका, चौधरी पेट्रोल पंप येथे कोरोना तपासणी करण्यास पाठविले जात आहे.
तिप्पलसीट जाणे पडले महागात
२० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरातून नांदेड नाकाहून खटकाळीकडे जाणाऱ्या एका मोटारसायकलवरील तिघांना पोलिसांनी थांबविले. विशेष म्हणजे तिघांनीही मास्क लावले नव्हते. वाहन थांबविताच मागच्या तिसऱ्याने खाली उतरून पळ काढला; परंतु, काहीच अंतरावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. या अगोदरच पोलिसांनी दोघांनाही पकडून ठेवले होते. अखेर तिघांनाही अँटिजेन टेस्ट करण्यास भाग पाडले. कोरोना तपासणीनंतर त्यांना कुठे पाठविले हे मात्र कळू शकले नाही.