फळबागेत आंतरमशागतीची कामे करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:49+5:302021-06-10T04:20:49+5:30
हिंगोली : नवीन केळी लागवडीसाठी पूर्वतयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत, तसेच आंतरमशागतीची कामे उरकून घ्यावीत, ...
हिंगोली : नवीन केळी लागवडीसाठी पूर्वतयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत, तसेच आंतरमशागतीची कामे उरकून घ्यावीत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांनी केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत. नवीन आंबा लागवडीसाठी पूर्वतयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत. पूर्वी लागवड केलेल्या बागेमध्ये आंतरमशागतीची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे, तसेच नवीन सीताफळलागवडीसाठी पूर्वतयारीची कामे लवकर करून घ्यावीत.
पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास ते लवकर टाकून घ्यावे. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनुसार झाऱ्याच्या साह्याने पाणी द्यावे.
पशुधनास लस द्यावी
पावसाळ्याचे दिवस पाहता पशुधनाची तज्ज्ञ डॉक्टर मंडळीकडून तपासणी करून घ्यावी. घटसर्प, फऱ्या रोगप्रतिबंधक लस पशुधनास द्यावी, तसेच पशुधनास उघड्यावर बांधू नये. पावसाळ्याचे दिवस पाहता पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी.
-डॉ. कैलास डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मोसम सेवा विभाग