हिंगोली जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव; नऊ गावांच्या परिसरात लसीकरण
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 19, 2022 11:46 AM2022-09-19T11:46:19+5:302022-09-19T11:46:59+5:30
राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे.
हिंगोली : जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून नऊ गावांतील काही जनावरांना याची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. यात अनेक गुरे व म्हशी दगावल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात मात्र एकही बाधित जनावर आढळून आले नव्हते. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला होता. शिवाय पशुसंवर्धन विभागाच्या वतीनेही लम्पी चर्म रोगाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यास सुरुवात केली होती. पशुपालकांमध्ये जनजागृती, उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात होते. गाय वर्गीय व म्हैस वर्गीय जनावरांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आली होती. जनावरांचे बाजार, प्राण्याच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, पशू प्रदर्शन आयोजित करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सेनगाव तालुक्यातील सेनगाव, मकोडी, चिंचखेडा, औंढा तालुक्यातील असोला तर्फे औंढा, वसमत शहर, हिंगोली तालुक्यातील चोरजवळा, मालसेलू, वांझोळा येथे लम्पी चर्म आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत. संशयित जनावरांचे नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यात लम्पी चर्म आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गावांच्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. कदम यांनी दिली.
आजार बरा होतो
वेळीच उपचार झाल्यास लम्पी चर्म रोग बरा होतो. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी जनावरे न्यावीत. तसेच बाधित गावांतील पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन - डॉ. कदम यांनी केले आहे.