लाच प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न; सहा महिन्यांनंतर झाली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:21 PM2021-01-30T13:21:18+5:302021-01-30T13:23:03+5:30
भाटेगावच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेंतर्गत ३२ लाभार्थींचे वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाचे धनादेश देण्यासाठी लाच प्रकरण
कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील ग्रामपंचायत भाटेगावच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेंतर्गत ३२ लाभार्थींचे वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाचे धनादेश देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यासाठी पाच हजार रुपये, तर स्वतःसाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या सहायक लेखाधिकाऱ्यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १५ जुलै २०२० रोजी रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर यात गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचाही लाच घेण्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना २७ जानेवारी रोजी अटक केली.
तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या योजनेंतर्गत ३२ लाभार्थींचे वैयक्तिक शौचालयाची बांधकामाचे अग्रिमचे तीन लाख ८४ हजार रुपयांच्या धनादेशावर तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांची स्वाक्षरी घेऊन धनादेश देण्यासाठी त्याच्यासाठी आठ हजार रुपये, तर स्वतःसाठी एक हजार असे नऊ हजार रुपयांच्या लाचेची मागणी पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी केली होती. त्यानंतर स्वतःसाठी दोन हजार व गटविकास अधिकारी यांच्यासाठी पाच हजार रुपये देण्याचे ठरले; परंतु ही लाच देण्याच्या मन:स्थितीत लाभार्थी नव्हते. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून १५ जुलै २०२० रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर सहायक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या लाच प्रकरणात गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे का? यासाठी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल तपास केल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी यांचा लाच मागणीत समावेश असल्याचे निष्पन्न झाले. नंतर २७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपाधीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक ममता अफुने, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय उपरे, महारुद्र कबाडे, विनोद देशमुख, तानाजी मुंढे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, प्रमोद थोरात यांच्या पथकाने कामगिरी केली. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर खिलारी यांच्यावर कारवाई झाल्याने कळमनुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.