‘लम्पी’ने बाधित जनावरे ‘क्वारंटाईन’ करणे बंधनकारक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:39 PM2020-09-09T18:39:54+5:302020-09-09T18:40:07+5:30
‘लम्पी स्किन डिसीज’ जडलेल्या जनावरांच्या अंगावर गाठी येतात, ताप येऊन रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते.
हिंगोली : चावणाऱ्या माशा, डास, गोचिड, चिलटांमुळे प्रामुख्याने संकरित जनावरांमध्ये झपाट्याने प्रसार होत असलेल्या ‘लम्पी स्किन डिसीज’ने हिंगोली जिल्ह्यातीलही हजारांपेक्षा अधिक जनावरांना आपल्या कवेत घेतले आहे. हा संसर्गजन्य आजार इतर निरोगी जनावरांना जडू नये, यासाठी ‘लम्पी’ बाधीत जनावरांना ‘क्वारंटाईन’ (विलगीकरण) करणे बंधनकारक केले जात आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरले असून त्याचा प्रकोप हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले असताना गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन डिसीज’ नावाच्या आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. अचानक ओढवलेल्या या नव्या संकटामुळे पशुपालक हैराण झाले आहेत. ‘लम्पी स्किन डिसीज’ जडलेल्या जनावरांच्या अंगावर गाठी येतात, ताप येऊन रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते. रक्तमिश्रीत पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हा आजार जडलेल्या जनावरांपासून इतर निरोगी जनावरे बाधीत होऊ नये, यासाठी पशुपालकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रामुख्याने इतर निरोगी जनावरांपासून त्यांना दूर ठेवण्याकरिता त्यांना ‘क्वारंटाईन’ करण्याचा सल्ला पशूसंवर्धन विभागाकडून दिला जात आहे.
लम्पी बाधीत जनावरांचा ताप कमी करण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या सल्ल्याने औषध देणे, प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील प्रामुख्याने ग्रामीण भागात ‘लम्पी’ आजाराने बाधीत जनावरे आढळत असून आजमितीस हा आकडा हजारांपेक्षा अधिक झालेला आहे. त्यात बऱ्या होणाऱ्या जनावरांचे प्रमाणदेखील ७० टक्के असून पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लम्पी स्किन आजाराची लक्षणे व उपाययोजना
लम्पी स्किन डिसीजमुळे जनावरांच्या अंगावर, पाठीवर व मानेवर गाठी येतात, पाय आणि पोळीवर सूज येते, तोंडातून लाळ किंवा नाकातून चिकट द्रव पडते, बाधीत जनावरांना १०३ ते १०६ डिग्री ताप येतो, दुध उत्पादनात लक्षणिय घट येते.४सदर लक्षणे आढळून आल्यास जनावरांचे व गोठ्याचे निर्जंतूकीकरण करावे, १ लीटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिली निम तेल, एका साबनाची वडी टाकून मिश्रीत द्रावणाने किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या निर्जंतूक द्रावणाने गोठ्यात दर ३ दिवसांनी फवारणी करावी, परिसर स्वच्छ ठेवावा.४जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावा, बाधीत जनावरांना निरोगा जनावरांपासून वेगळे करावे, असा सल्ला पशूसंवर्धन विभागाकडून देण्यात आला आहे.
काळजी घेणे हाच सक्षम पर्याय- घुले
जनावरांना जडत असलेल्या ‘लम्पी स्किन डिसीज’वर नियंत्रण मिळविण्याचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. पशुपालकांनीही सुचविलेल्या सर्व सुचनांचे पालन करावे. ‘लम्पी’ची बाधा झालेली जनावरे इतर निरोगी जनावरांसोबत न बांधता त्यांना विलगीकरणात ठेवावे. जनावरांचा गोठा निर्जंतूक करून घ्यावा. त्याठिकाणी सदोदित स्वच्छता ठेवावी. जनावरांना औषधी नियमित द्यावी, असे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले यांनी केले आहे.
कनेरगाव परिसरातील पशुपालक हैराण
कनेरगाव नाका : परिसरातील ग्रामीण भागात कोरोनापाठोपाठ ‘लम्पी’ नामक आजाराचा प्रकोप वाढत आहे. जनावरांमधील या आजारामुळे पशुपालक पुरते हैराण झाले आहेत. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत कनेरगाव नाका, मोप, कानरखेडा बु., कानरखेडा खु., कलबुर्गा, चिंचपुरी, वाढोणा आदी गावे येत असून ६० ते ७० जनावरांना ‘लम्पी’ची लागण झाली आहे. कानरखेडा बु, येथे तुलनेने जनावरांची संख्या अधिक आहे़ लागण झालेल्या जनावरांना ६ ते १० फूट अंतरावर बांधून ठेवल्याचे दिसून येत आहे.
कळमनुरी तालुक्यात दोन हजार लस
कळमनुरी : लम्पी आजारावर नियंत्रणासाठी तालुक्याला २ हजार लस उपलब्ध झाल्या असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ़ नंदकिशोर जाधव यांनी दिली. लम्पी हा विषाणूपासून होणारा संससर्गजन्य आजार असून तो झपाट्याने पसरत आहे़ यासाठी तालुक्याला नांदेड व परभणी येथून दोन हजार लस उपलब्ध झाली आहे. आजारासंबंधी पशूसंवर्धन विभागाने पत्रक काढून जनजागृती केली आहे़ मागील १५ दिवसांपासून या आजाराची लागण झालेली जनावरे तालुक्यात आढळून येत आहेत़ तालुक्यात आतापर्यंत ८९ जनावरांना लम्पीचा आजार जडला असून उपाययोजना केल्या जात आहेत. ५ व ६ सप्टेंबर रोजी १८०० लस गायवर्गीय जनावरांना देण्यात आल्या आहेत. जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळल्यास तत्काळ जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आणावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.