अतिवृष्टीच्या अनुदान मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:51 PM2022-09-14T18:51:45+5:302022-09-14T18:52:05+5:30
नायब तहसीलदारांच्या लेखी आशावासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
कळमनुरी (हिंगोली ): अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने तालुक्यातील वाकोडी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास इसापूर धरणात जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान, नायब तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी वाकोडी मंडळातील एक ते दीड हजार शेतकरी आज इसापूर धरणाच्या पाण्याजवळ जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झाले. काही शेतकरी पाण्यात उतरले तर काहींनी अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार सतीश पाठक यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
मंडळातील सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात सखाराम उबाळे, विनोद बांगर, माधवराव सुरोशे यांच्यासह वाकोडी, गौळबाजार , शिवनीबु, बाभळी, सुकळी, गागापुर, कडपदेव ,खापरखेडा, वाई ,तरोडा, ढोलक्याची वाडी आदी गावातील शेतकऱ्यांचा सहभाग होता.