सोडेगाव येथे जलदिंडीचा समारोप कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:04 AM2018-06-06T00:04:41+5:302018-06-06T00:04:41+5:30
लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.
जलदिंडी समारोप प्रसंगी खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, औंढा पं. स. सभापती भिमराव भगत आदी उपस्थित होते.
खा. राजीव सातव यांनी जलदिंडीत सर्व सहभागींचे अभिनंदन केले. कयाधू मुख्य नदी असून लोकसहभाग मिळाला तर नदी जिवंत होऊ शकते असे ते म्हणाले. केंद्रशासनाकडूनही या कामासाठी मदत मिळू शकते, असेही ते म्हणाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना खा. सातव म्हणाले प्रत्येकांनी दैनंदिन डायरी लिहिण्याचा सराव करावा. स्वत:चा गुरु हा स्वत:च असतो. डायरी लिहिण्याची सवय जडली तर आपण किती चुकलो किंवा यशस्वी झालो याचा अभ्यास करणे शक्य होते. त्यातून सुधारणाही करता येते असे त्यांनी सांगितले.
आ. डॉ. संतोष टारफे म्हणाले कयाधू नदी हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून वाहते. तसेच नदीचे खोरे हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. नदी जिवंत झाली तर बहुतांश कुटुंब सुखी होतील व शेतीविषयक समस्यांना आळा बसेल.
उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले जल हे जीवन आहे, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पाणी उपसा थांबवून पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
विभागीय वनाधिकारी केशवराव वाबळे म्हणाले पर्यावरण दिनाच्या निमिताने जलदिंडीचा समारोप होत आहे. परंतु प्रत्येकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे. तसेच रोपांची जोपासनाही करावी. जर जंगलाचे प्रमाण वाढले तर जमिनीतील पाणी पातळी वाढू शकेल. जैवविविधता टिकून राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना झाड वाटप करण्यात आले. उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईराव म्हणाले सर्व समस्यांचे मूळ हे पाणी आहे. जर पाणी नसले तर समस्या वाढतील आणि मानव विकास निर्देशांकही खालावला जाईल. त्यामुळे कयाधू नदीला पाझर फोडावा लागेल. त्यासाठी लोकांच्या मनात पाझर फोडणे गरजेचे आहे. शाहीर धम्मानंद इंगोले यांनी गीत सादरीकरणातून महत्त्व सांगितले.