जीपला अपघात; १0 भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:21 AM2019-03-05T00:21:12+5:302019-03-05T00:21:31+5:30
हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ जीप व कंटनेरची ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक होवून १० जण जखमी झाल्याची घटना घडली. जीपमधील भाविक दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ जीप व कंटनेरची ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक होवून १० जण जखमी झाल्याची घटना घडली. जीपमधील भाविक दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते. अपघातातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
जीप क्र. एम.एच.२२ के. ३१३१ ही हट्टा येथून कारला येथे दर्शनासाठी १० जण जात होते. तर नांदेडहून हिंगोलीकडे जाणारा कंटनेर क्र. एन.एल ०१- एए ९३०१ या दोन वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये तुकाराम जाधव (६०), लक्ष्मीबाई जाधव (६५), मनकर्निका जाधव, शिवम जाधव, शिवराज जाधव, सरस्वती जाधव सर्व रा. सोन्ना, ता. वसमत तसेच प्रल्हाद भवर, प्रतिभा भवर, सत्यभामा भवर (तिघे रा. हट्टा), गोकर्णा जाधव (६०, रा.सोन्ना) हे जखमी झाले आहेत. यातील तुकाराम जाधव, लक्ष्मीबाई जाधव, प्रल्हाद भवर हे तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले. जखमींवर डॉ. आनंद मेने, डॉ. महेश पंचलिंगे, डॉ.सोफीया खान, सीमा सोनवणे, संध्या मोरे यांनी उपचार केले. बोलेरोमधील १० जण दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते.
अपघात घडताच अमोल कांबळे, लखन पर्वत, अनिल इंगळे, प्रथम रिठ्ठे, कृष्णा कºहाळे, स्वप्नील खोकले, स्वप्नील भगत यांनी जखमींना आॅटोमध्ये टाकून ग्रामीण रूग्णालयात आणले. या अपघातात जीपचा समोरील भाग चक्काचूर झाला असून कंटनेरच्या डिझेलची टाकी फुटली आहे. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. कंटनेरच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.