हिंगोलीतून चोरी गेलेली जीप सापडली तेलगंणात
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 7, 2023 02:50 PM2023-09-07T14:50:17+5:302023-09-07T14:50:47+5:30
जिल्हा परिषदेच्या मैदान परिसरातून झाली होती चोरी
हिंगोली : शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्ते घेऊन आलेली जीप चोरट्यांनी हिंगोलीतून पळवली होती. ही जीप तेलंगणात आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाकडून जीप ताब्यात घेतली.
शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची २७ ऑगस्ट रोजी हिंगोली शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हिंगोलीसह नांदेड, परभणी, यवतमाळ आदी जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते. जिल्हा परिषदेच्या मैदान परिसरात वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सभेसाठी ढाणकी (ता. उमरखेड) येथील शेख अजीम शेख रहिम हे त्यांच्या मालकीच्या जीपमध्ये कार्यकर्तें घेऊन आले होते. जि.प. मैदान परिसरात त्यांनी जीप उभी करून ते सभेसाठी गेले होते. जीप जवळ कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यानी जीप चोरून नेली होती.
या संदर्भात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता.
दरम्यान, जीपचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. ही जीप तेलंगणा राज्यात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेलंगणा गाठत अविनाश पांडुरंग पखाले (वय २२ रा.ढाणकी ह.मु. अदिलाबाद, तेलंगणा) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने जीपची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचेकडून दीड लाख रूपये किमतीची जीप ताब्यात घेतली. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.