पॉक्सो प्रकरणात ३ महिन्यात निकाल; अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्ष कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 07:25 PM2023-05-09T19:25:59+5:302023-05-09T19:26:10+5:30

या प्रकरणाचा तपास तातडीने करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बक्षिस

Judgment in POCSO case in 3 months; 20 years imprisonment for the murderer who committed the torture | पॉक्सो प्रकरणात ३ महिन्यात निकाल; अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्ष कारावास

पॉक्सो प्रकरणात ३ महिन्यात निकाल; अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्ष कारावास

googlenewsNext

- इस्माईल जहागिरदार
वसमत (हिंगोली):
इंजनगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यू. सी. देशमुख यांनी २० वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. न्यायाधीश देशमुख यांनी जलद सुनावणी घेत या प्रकरणाचा निकाल अवघ्या २ महिने २२ दिवसांत दिला.

तालुक्यातील इंजनगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी प्रथम ३० मे २०२२ रोजी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरनं. ८७ / २०२२ कलम ३६३ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी करून गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपींचा शोध घेतला. पीडित मुलीस आई-वडीलांच्या ताब्यात दिले. आरोपी शुभम केशव गायकवाड (रा. इंजनगाव) यास अटक करून तपास केला. तपासात आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपासी अधिकारी यांनी गुन्ह्यात कलम ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एन) भादवीसह कलम ३,४ बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये कलम वाढ करून गुन्ह्याचा सखोल व जलदगतीने तपास केला. आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

सदर प्रकरणी अपर जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश देशमुख यांनी जलद सुनावणी घेत सर्व साक्ष पुरावे तपासून २ महीने २२ दिवसांत गुन्ह्याचा ८ मे रोजी निकाल दिला. न्यायालयाने आरोपी शुभम केशव गायकवाड (रा. इंजनगाव) यास भारतीय दंड संहिता व बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ नुसार दोषी ठरवून २० वर्ष सश्रम कारावास व ७० हजार रुपये द्दंडाची शिक्षा ठोठावली.  यावेळी सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील संतोष के. दासरे यांनी भक्कमपणे मांडून सदर गुन्ह्यात दोषसिद्ध होण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षिस
सदरील गुन्ह्याचा तपास तातडीने लावत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विलास सुदामराव चवळी यांना २ हजार रूपये, सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांना १ हजार रुपये व कोर्ट पैरवी वंजे यांना १५०० रूपये बक्षीस दिले.

Web Title: Judgment in POCSO case in 3 months; 20 years imprisonment for the murderer who committed the torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.