२२ जुलै रोजी जि.प. सभापती निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:53+5:302021-07-02T04:20:53+5:30
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर आता सभापती निवडीची तारीख कधी? निघणार याकडे सर्वांचे ...
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर आता सभापती निवडीची तारीख कधी? निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच डेल्टा प्लस कोरोना विषाणूने प्रशासनाची घाबरगुंडी उडविली आहे. त्यामुळे ही तारीख लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र काही सदस्य व पदाधिकारी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तगादा लावत असल्याचे दिसून येत होते.
दुसरीकडे पदाधिकारी व त्यांचे समर्थक आशा ३५ जणांचा एक तर पायउतार झालेल्या सभापती चव्हाण यांच्यासह १५ जणांचा वेगळा गट तयार झाला आहे. पंधरा जणांना निधी दिला जात नसल्याने वातावरण पेटलेले आहे. हा धुरळा शांत झाल्यानंतर सभापती निवड करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे दिसत होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता जि.प. सभागृहात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे हे पीठासीन अधिकारी राहणार आहेत.
सध्या जिल्हा परिषदेत संजय कावरखे, यशोदा दराडे, रीता दळवी यांच्या नावाची सभापती पदासाठी चर्चा आहे. मात्र ऐनवेळी वेगळेच नाव समोर येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीला सभापती पदाचे नाव निश्चित करण्यात मोठ्या पेचप्रसंगला सामोरे जावे लागत आहे. आमदारांच्या विरोधामुळे काही जणांची नावे आपोआपच कापली जात आहेत.