कळमनुरी तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:43+5:302020-12-24T04:26:43+5:30
कळमनुरी तालुक्यातील ११ हजार ७८३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात अँटिजन चाचणीत १९५ जण, तर थ्रोट स्वॅबने ...
कळमनुरी तालुक्यातील ११ हजार ७८३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात अँटिजन चाचणीत १९५ जण, तर थ्रोट स्वॅबने ७२६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाबाधित ७१९ रुग्णांना बरे झाल्यावर घरी साेडण्यात आले आहे. आता फक्त ६ रुग्ण येथील कोरोना केअर केंद्रात उपचार घेत आहेत. तालुक्यातील ७२ गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अजूनही तालुक्यातील ८३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. सध्या तालुक्यातील वाई, उमरदरा, घोळवा, आखाडा बाळापूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याबाहेर एकूण १९ कोरोनाबधितांचा मृत्यू झालेला असून, तालुक्यात आतापर्यंत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. जिल्हास्तरावर १७ कोरोनाबाधित व जिल्ह्याबाहेर ४२, अशा एकूण ५९ कोरोनाबाधितांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले आहे.
तालुक्यात फक्त ६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झालेली आहे, तसेच सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने रुग्णसंख्या आपोआपच घटली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने यांनी केले आहे.