कळमनुरी तालुक्यात निराधारांची सूक्ष्म तपासणी मोहीम रखडली, ६ गावाचे ११६८ अहवाल अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:04 PM2018-02-02T17:04:07+5:302018-02-02T17:04:51+5:30
कळमनुरी तालुक्यात निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यात निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही.
कळमनुरी तालुक्यात एकूण ९ हजार २७१ निराधार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. या तपासणीत लाभार्थी मयत आहे का? मुले नोकरीला आहेत का? यासह स्थलांतरीत लाभार्थी, लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर आदींची सूक्ष्म तपासणी तलाठ्यांमार्फत घरोघरी जावून केली जात आहे. सूक्ष्म तपासणी अहवालावर मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच यांच्या स्वाक्षरीनिशी सदरचा अहवाल हा तहसील कार्यालयात सादर केला. परंतु, तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ५०, कळमनुरी- ९४८, नांदापूर-५१, हरवाडी-०६, सिंदगी-९८, जांब-६१५ अशा एकूण १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल अद्यापपर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्यात आला नाही. सदरील अहवाल सादर करण्याबाबत तलाठ्यांना यापूर्वी ५ वेळा नोटिसा बजावण्यात आल्या. परंतु, अद्यापपर्यंत १ हजार १६८ लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल हा सादर करण्यात आला नाही.
दरम्यान, ज्या गावांतील तलाठ्यांनी सदरचा सूक्ष्म तपासणी अहवाल सादर केला नाही, त्या गावांतील तलाठ्यांना आता अहवाल सादर करण्यासंदर्भात पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतरही तलाठ्यांनी सदरचा तपासणी अहवाल सादर केला नाही, तर संबंधित तलाठ्यांविरूद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, २० टक्के लाभार्थ्यांची आधार लिकिंग नाही. संजय गांधी, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धपकाळ श्रावण बाळ या योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांचे आधार लिकिंगचेही काम सुरू आहे.
सदरील काम हे मागील ८ ते १० महिन्यापासून सुरू करण्यात आले असून सद्यस्थितीत २० टक्के लाभार्थ्यांनीही आधार क्रमांक तहसील कार्यालयात जमा केला नाही. त्यामुळे सदर लाभार्थ्यांच्या आधार लिकिंगचे काम रखडले असून १ जानेवारीपासून निराधार लाभार्थ्यांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
.... नसता तलाठ्यांविरूद्ध होणार कारवाई
ज्या गावांतील तलाठ्यांनी सदरचा सूक्ष्म तपासणी अहवाल सादर केला नाही, त्या गावांतील तलाठ्यांना आता अहवाल सादर करण्यासंदर्भात पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतरही तलाठ्यांनी सदरचा तपासणी अहवाल सादर केला नाही, तर संबंधित तलाठ्यांविरूद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संबंधित तलाठ्यांना सदर लाभार्थ्यांचे अहवाल देणे आवश्यक आहे. अहवालानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे.