कयाधू नदी होतेय मृतप्राय
By Admin | Published: December 1, 2014 03:07 PM2014-12-01T15:07:12+5:302014-12-01T15:07:12+5:30
शहराजवळून /वाहणार्या कयाधू नदीत मोठय़ा प्रमाणात कचर्याचे ढिगारे साचले असून गटाराचे पाणीही याच नदीत सोडले जात आहे.
हिंगोली : /शहराजवळून /वाहणार्या कयाधू नदीत मोठय़ा प्रमाणात कचर्याचे ढिगारे साचले असून गटाराचे पाणीही याच नदीत सोडले जात आहे. प्रवाहित नसलेल्या या नदीपात्रात उतरणेही मुश्किल झाले असून दुर्गंधीने परिसीमा गाठली आहे.
हिंगोली जिल्ह्याची ओळख कयाधू नदीने होते. यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने नदीला एकदाही मोठा पूर आला नाही. एक-दोनदा साधारण पाणी वाहिले. मात्र त्यामुळे यात साठलेली घाण काही वाहून गेली नाही. या नदीची साफसफाई करण्यासाठी न. प. ला वेळ नाही. मात्र त्यात नागरिक व पालिकाही घाण आणून टाकत आहे. शिवाय नदीच्या शहरातील ड्रेनेजचे घाण पाणीही नदीत सोडले जाते. नदीत येत असलेले ड्रेनेजचे पाणी ठराविक अंतरावर सोडणे गरजेचे असतानासुध्दा कुणी पुढाकार घेतलेला नाही. मलनिसारण प्रकल्प उभारण्याइतपत पालिकेची स्थिती सक्षम नाही. असा प्रकल्प उभारण्यासाठी आतापर्यंत कोणी जागरुकपणे नदीच्या उपयुक्ततेकडे पाहिलेही नाही. परिणामी, घाणीत जास्तच भर पडत आहे. तसेच नदीत मृत प्राणी आणून टाकले जात असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. येथून जवळच मोठा पूल आहे. या मार्गावर औंढा नागनाथ व नर्सी नामदेव हे मुख्य दोन देवस्थाने असल्याने दर्शनासाठी बाहेर गावावरून भक्तगण येतात. या नदीचे असे बेहाल पाहून त्यांना पुढे जावे लागते. शिवाय हिंगोलीत येणार्यांचे दुर्गंधीनेच स्वागत होते. तसेच या भागात महादेव मंदिर असल्याने दर सोमवारी महिला येथे दर्शनासाठी येतात. मात्र त्यांनासुध्दा घाणीचा सामना करावा लागत आहे. नजीकच दोन स्मशानभूमी आहेत. तेथेही येणार्यांनाही हेच दिसते. युवा प्रतिष्ठानने नदीच्या साफसफाईसाठी पुढाकार घेतला होता. काही काळ कार्यकर्ते येथे राबलेही मात्र त्यांना कुणाचीही साथ मिळाली नाही. /(प्रतिनिधी)
पात्र बनले उथळ
■ शहरानजीक नदीपात्रात दरवर्षी कचरा टाकला जात असल्याने येथे पात्र उथळ बनत आहे. त्यामुळे अतवृष्टी झाल्यास पुराचा धोका होण्याची शक्यता आहे. तर घाणीमुळे येथील जैवविविधतेवरही परिणाम होत आहे.
--------------
नदी पात्रात थेट ड्रेनेजचे घाण पाणी न जाण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी मलनिसारण केंद्रा उभारणीच्या प्रस्तावासाठी बैठक घेवून मंत्रालयाकडे तो पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ड्रेनेजचा प्रश्न २५ वर्षांपर्यंत सुटण्यास मदत होणार आहे. तसेच नदीच्या साफसफाईसाठी जानेवारीत बैठक घेण्यात येणार असून नदीतील सफाईचे टेंडर काढण्यात येणार आहे. त्यांनतर सात दिवसांच्या आत साफसफाई केली जाईल. - हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, न.प.हिंगोली मलनिस्सारण केंद्राचा प्रस्ताव पाठविणार