कयाधू नदीला पूर, समगा येथील पूल तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:34 AM2021-07-12T11:34:15+5:302021-07-12T11:35:59+5:30
पहिल्याच मोठ्या पुरात हा पूल तुटल्यामुळे यापुढील पावसात उर्वरित पूलही वाहून जाणार असे दिसते. त्यामुळे या गावाला पुन्हा पुलासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
हिंगोली: येथून जवळच असलेल्या समगा येथील पूल यंदा पुन्हा पावसामुळे तुटल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये हे नुकसान झाले आहे.
कयाधू नदीवर असलेल्या या पुलावरून समगा गावात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. नदीला मोठा पूर आला तर या पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र मागील काही वर्षांपासून या नदीला पूर आला की पूल तुटत आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.
आता पहिल्याच मोठ्या पुरात हा पूल तुटल्यामुळे यापुढील पावसात उर्वरित पूलही वाहून जाणार असे दिसते. त्यामुळे या गावाला पुन्हा पुलासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या पुलाची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी होत आहे.