रॉकेलचा कोटा ९६ हजार लिटरने घटला
By Admin | Published: April 28, 2015 10:07 PM2015-04-28T22:07:56+5:302015-04-29T15:51:43+5:30
औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याच्या केरोसिनच्या कोट्यात पुन्हा एकदा कपात केली आहे. यावेळी दर महिन्याचा हा कोटा ९६ ...
औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याच्या केरोसिनच्या कोट्यात पुन्हा एकदा कपात केली आहे. यावेळी दर महिन्याचा हा कोटा ९६ हजार लिटरने कमी झाला आहे. परिणामी जिल्ह्याला यापुढे महिन्याकाठी १७ लाख ४ हजार लिटर इतकेच रॉकेल मिळणार आहे.
सामान्य नागरिकांना स्वयंपाक आणि दिवाबत्तीसाठी केंद्र सरकारकडून सवलतीच्या दरात रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, स्वयंपाकासाठी गॅसचा वापर वाढत असल्यामुळे सरकारकडून सातत्याने रॉकेलचा कोटा कमी केला जात आहे. गेल्या साडेचार वर्षांत आतापर्यंत सहाव्यांदा हा कोटा कमी करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्याला दर महिन्याला १९ लाख ९२ हजार लिटर रॉकेल मिळत होते. मात्र डिसेंबर महिन्यात हा कोटा ३९ टक्क्यांनी कमी करून तो १२ लाख ३६ हजार लिटर करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोटा कमी करण्यात आल्यामुळे त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्याची दखल घेत सरकारने हा कोटा पुन्हा काहीसा वाढवून तो १८ लाख लिटर केला. परंतु आता एप्रिलपासून यात पुन्हा कपात करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार यापुढे जिल्ह्याला १७ लाख ४ हजार लिटर इतकेच रॉकेल मिळणार आहे. रॉकेलचा कोटा कमी झाल्यामुळे विशेषत: ग्रामीण नागरिकांची गैरसोय होणार आहे.
साडेचार वर्षांत ७५ टक्के कपात
साडेचार वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यास महिन्याला ६८ लाख लिटर रॉकेल मिळत होते. आतापर्यंत सहा वेळा यात कपात केली गेली. आता हा कोटा ६८ लाख लिटरवरून १७ लाख ४ हजार लिटरवर आला आहे. जिल्ह्यात एकूण ७ लाख २१ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. यातील ग्रामीण भागातील बहुतेक कुटुंबे स्वयंपाकासाठी तसेच दिवाबत्तीसाठी आजही रॉकेलचाच वापर करतात. साडेचार वर्षांपूर्वी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे दोन लिटरप्रमाणे रॉकेल मिळत होते. आता कोटा सातत्याने कमी कमी झाल्यामुळे एका कुटुंबामागे प्रत्येकी दोन लिटर इतकेच रॉकेल मिळत आहे.