कृषी विज्ञान केंद्रातर्फे खरीप शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:52+5:302021-06-10T04:20:52+5:30
हिंगोली : तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शेतकरी मेळावा घेण्यात ...
हिंगोली : तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. देवसरकर म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राने हा मेळावा योग्यवेळी आयोजित केला आहे. मेळाव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे, असे सांगून त्यांनी पिकांची फेरपालट, आंतरपीक पद्धतीद्वारे उत्पन्नात वाढ, माती परीक्षणानुसार नत्र खताची मात्रा विभागून देण्यासंदर्भात व एकात्मिक रोग व्यवस्थापन या विषयावर प्रकाश टाकला.
समारोपात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी जिल्ह्यात सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे मुबलक बियाणे उपलब्ध असून, खतांचीसुद्धा मुबलक उपलब्धता आहे. डीएपी खताचा तुटवडा असल्यास त्याऐवजी सरळ खते वापरून पिकाची गरजेनुसार मात्रा पूर्ण करावी. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उगवण क्षमता तपासणी मोहीम पूर्ण केली असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठीची पूर्ण तयारी केली आहे. मात्र ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. पेरणीसाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे यंत्र उपलब्ध नसल्यास पर्यायी अवजारांचा वापर करून रुंद सरी वरंबे तयार करावे आणि मूलस्थानी जलसंधारण करून पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दर मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने विविध पिकांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत असून, कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमाला डॉ. कल्याण आपेट, कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषयाचे विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे, डॉ. एस. पी. म्हेत्रे, अजयकुमार सुगावे, डॉ. पी. पी. शेळके, डॉ. कैलास गीते, कार्यालयीन अधीक्षक विजय ठाकरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक शिवलिंग लिंगे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार कृषिविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ राजेश भालेराव यांनी मानले.