हिंगोली जिल्ह्यात पावसाने खरिपाचे नुकसान; रब्बीतील कोवळी पिके पाण्याखाली 

By विजय पाटील | Published: November 27, 2023 11:20 AM2023-11-27T11:20:21+5:302023-11-27T11:22:47+5:30

या पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे.

Kharipa damaged by rain in Hingoli district; Young crops in rabi under water | हिंगोली जिल्ह्यात पावसाने खरिपाचे नुकसान; रब्बीतील कोवळी पिके पाण्याखाली 

हिंगोली जिल्ह्यात पावसाने खरिपाचे नुकसान; रब्बीतील कोवळी पिके पाण्याखाली 

- विजय पाटील

हिंगोली :जिल्ह्यात सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी  खरीप पिकांचे नुकसान झाले असून रब्बी पिकांना काही प्रमाणात दिलासा तर काही प्रमाणात फटका बसला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या काळात कमी पाऊस झाल्यामुळे यंदा उत्पन्न घटले.  पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात व शेवटच्या काळात पाऊस लांबणीवर गेला किंवा गायब झाला. आता हिवाळा सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रीच काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. मात्र मध्यरात्रीपासून काही भागात पावसाचा जोर वाढला.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, पुसेगाव पानकनेरगाव आदी भागात हा पाऊस झाला. विजांचा प्रचंड कडकडाट होत होता. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव, दिग्रस कराळे , नरसी नामदेव परिसरातही पावसाने हजेरी लावली. काही भागात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले तर नाल्यांना व ओढ्यांना चांगलेच पाणी वाहत असल्याचे पाहायला मिळाले. वसमत तालुक्यात कवठा, कुरुंदा, हट्टा या परिसरात सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. 

या पावसामुळे खरिपातील कापूस तूर या पिकांसह रब्बीतील कोवळी पिके पाण्याखाली गेल्याने मोठा फटका बसला आहे. यामुळे  साखर कारखान्याची ऊस वाहतूकही बंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील विविध भागात पावसामुळे रब्बी व खरीप पिकाच्या नुकसानीची ओरड होत आहे. 

वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर दोघे जखमी
औंढा नागनाथ तालुक्यातील  गोजेगाव शिवारात रात्री  पाऊस येत असल्याने  राजू शंकर जायभाये (गोजेगाव) विष्णू सीताराम नागरे (गोजेगाव) व  बन्सी गीते (हिवरखेडा) हे तिघे मित्र चिमेगाव लगत असलेल्या खंडोबा मंदिरात थांबले होते. रात्री दोनच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने मंदिराच्या दारात उभ्या असलेल्या गोजेगाव येथील राजू शंकर जायभाये (वय २६ ) याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले असून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचेवर उपचार चालू आहेत.

Web Title: Kharipa damaged by rain in Hingoli district; Young crops in rabi under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.