मोदींसारखा खोटारडा माणूस पंतप्रधानपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:18 AM2019-01-23T00:18:17+5:302019-01-23T00:18:38+5:30
खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा खोटारडा माणूस कोणी नाही. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा खोटारडा माणूस कोणी नाही. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामांतर वर्धापन दिनाच्या गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे झालेल्या कार्यक्रमात ते हिंगोलीत बोलत होते. यावेळी गणेशराव पडघन यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कवाडे म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन करायला आल्यावर डॉ.आंबेडकरांच्या घटनेमुळे चहावाला पंतप्रधान झाल्याचे सांगतात. तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री अनंतकुमार हेगडे संविधान बदलण्याची भाषा करतात. भाजपाचे इतरही अनेक लोक हे बोलतात. मात्र त्यांचे हे षडयंत्र पूर्ण होऊ दिले जाणार नाही. आंबेडकरांनी सामान्यांना, वंचितांना सत्तेचा वाटा मिळावा, असे म्हटले. मात्र भाजपवाल्यांचा त्याला विरोध आहे. पंधरा लाख खात्यावर टाकण्याचे आमिष दाखवून निवडून आले. नंतर नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सामान्यांच्या खिशातला पैसा पळवला. मोठ्यांना तो वाटला. असे हे खोटारडे असल्याचा आरोप त्यांनी केला. धनगर समाजाचा मोर्चा निघाला. तेथे हजारो समाजबांधव ठाण मांडून बसले होते. तेव्हा तेथे देवेंद्र फडणवीस गेले. पहिले काम हे आरक्षण देण्याचे करू, असे म्हणाले. मात्र अजून काहीच नाही. हे बनवाबनवीचे सरकार आहे. शेतकऱ्यांची तर घोर फसवणूक केली. देशात जातीयवाद वाढवला. महिलांची सुरक्षितता राहिली नाही. त्यामुळे अशांना पुन्हा थारा देऊ नका, असे आवाहनही कवाडे यांनी केले. तर सोळा वर्षांच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर झाले. हा लोक शाहीचा, चळवळीचा विजय असून त्यामुळे या भागात समतेचे राज्य प्रस्थापित झाल्याचेही ते म्हणाले.
यावेळी गोपाळराव आटोटे, आर.एल.तांबे, अॅड.जे.के. नारायणे, जयदीप कवाडे, दिलीप साठे, दिलीप भिसे आदी मान्यवरांची उपस्थिती होते.