हिंगोली जिल्हा रूग्णालयात रक्त तुटवडा; दात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 05:25 PM2019-07-22T17:25:53+5:302019-07-22T17:31:00+5:30
मागील काही दिवसांपासून रक्तदान शिबीरांचे प्रमाण कमी झाल आहे.
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून रक्तदान शिबीरांचे प्रमाण कमी झाल आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त पिशव्यांचा मुबलक साठा उपलब्ध नाही. त्यामुळे गरजू रूग्णांची ऐनवेळी गैरसोय होत आहे. तर जिल्हा रूग्णालयात तसेच इतर खाजगी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरजूंना वेळेत रक्त पिशव्या मिळत नसल्याचे दिसून येत आहे. रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. त्यात काही रक्त गटांच्या तर पिशव्याचा उपलब्ध नाहीत. ज्या रक्त गटाच्या आहेत त्याही अल्प प्रमाणात आहेत. दरदिवशी विविध रक्त गटाच्या जवळपास २५ रक्त पिशव्यांची आवश्यकता भासते. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे. जेणेकरून एखाद्या रक्ताची गरज असणाऱ्या रूग्णाचे प्राण वाचविण्यास मदत होईल.
२२ जुलै २०१९ रक्तपेढीतील पिशव्यांची संख्या...
हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत २२ जुलै रोजी ‘ए’ पोझीटीव्ह रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नाही. तसेच ‘ए’ निगेटीव्ह रक्त गटाची केवळ १ पिशवी उपलब्ध आहे. ‘बी’ पोझीटीव्ह रक्त गटाच्या १५ पैकी १३ बॅग शिल्लक आहेत. ‘बी’ निगेटीव्ह रक्तगटाची केवळ एक बॅग शिल्लक आहे. ‘एबी’ पोझीटीव्ह, ‘एबी’ निगेटीव्ह तसेच ‘ओ’ पोझीटीव्हची एकही बॅग रक्तपेढीत उपलब्ध नाही. तर ‘ओ’ निगेटीव्हच्या ३ रक्त बॅग शिल्लक असल्याची माहिती रक्तपेढीतर्फे देण्यात आली. २० पैकी केवळ १८ रक्त पिशव्याच उपलब्ध आहेत. रक्त पिशव्यांची मागणी जास्त आणि प्रत्येक्षात असलेला रक्तसाठा कमी असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.