नवोदय परीक्षेत नियोजनाचा अभाव; चिमूकल्यांनी धुळीत थंड फरशीवर बसून सोडवला पेपर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:25 IST2025-01-18T14:24:52+5:302025-01-18T14:25:23+5:30
या सर्व गोंधळात परिक्षेचा वेळ जात असल्याने पालकांनी तिव्र संताप व्यक्त केला.

नवोदय परीक्षेत नियोजनाचा अभाव; चिमूकल्यांनी धुळीत थंड फरशीवर बसून सोडवला पेपर
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि.हिंगोली): नवोदय परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची नियोजना अभावी मोठी गैरसोय पहावयास मिळाली. पालकांनी तिव्र संताप व्यक्त करताच शिक्षण विभागाने धावाधाव करत धुळीने माखलेली फरशी पुसून त्यावर विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली. या सर्व गोंधळात परिक्षेचा वेळ जात असल्याने पालकांनी तिव्र संताप व्यक्त करत शिक्षण विभागाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली.
जिल्हयात नवोदय परिक्षेसाठी २५ केंद्रावर ८ हजार विद्यार्थ्यांसाठी परिक्षेचे नियोजन करण्याबाबत १६ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांनी बैठक घेऊन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. १८ जानेवारी रोजी शहरासह तालुक्यातील सहा परिक्षा केंद्रावर २४७० परिक्षार्थी परिक्षा देणार होते. जिल्हा परिषद शाळेवरील परिक्षा केंद्रावर नवोदय परिक्षार्थी विद्यार्थ्यांना धुळ आसलेल्या फरशीवर परिक्षेसाठी बसवण्यात आले. जागे अभावी याच केंद्रावर दोन हॉल एकत्रित करण्यात आले होते. परिक्षा तणाव मुक्त होण्यासाठी परिक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना सुविधा आणि शांतता मिळाली नाही. विद्यार्थ्यांच्या गैरसोयी बाबत पालकांना कळताच त्यांनी केंद्रावरील शिक्षकांना खडेबोल सुनावले. त्यानंतर धावाधाव करत धुळीने माखलेल्या फरशीवर बसलेल्या विद्यार्थ्यांना बाजुला करत साफसफाई करण्यात आली. केंद्रावर परीक्षा सोडून अर्धातास हाच गोंधळ सुरू होता. माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांनी परिक्षा केंद्रावर भेट देऊन सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनाचे पितळ उघडे पडून निष्क्रियता समोर आल्याची तीव्र प्रतिक्रिया पालकांनी दिली.
विद्यार्थी अपात्र ठरला तर शिक्षण विभाग जबाबदार...
परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सुविधा देणे गरजेणे आसतांना येथे शिक्षण विभागाने कोणतीही सुविधा दिली नाही. धुळीने माखलेल्या फरशीवर त्यांना बसविण्यात आले. एकाच हॉल मध्ये दोन हॉलच्या विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. जर विद्यार्थी अपात्र ठरला तर याला शिक्षण विभाग जबाबदार राहील.
- चंद्रशेखर देशमुख,पालक.
धुळीने माखलेल्या खोलीत परिक्षा घेण्यात आली. परिक्षार्थी धुळीत का बसवले ? असे विचारताच यांच्याकडे उत्तर नव्हते.
- शेख सरवर,पालक.
सुविधे संदर्भात सुचना दिल्या होत्या...
१६ जानेवारी रोजी बैठकीत सर्व केंद्र संचालकांना परिक्षा केंद्रावर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्या संदर्भात सुचना दिल्या होत्या. जिप शाळेच्या केंद्रावर भेट देऊन परिक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था करुन देण्यात आली.
- सतीष कास्टे, गटशिक्षणाधिकारी, वसमत.