‘भूमिगत गटार’मध्ये नियोजनाचा अभावच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:34 AM2018-05-01T00:34:32+5:302018-05-01T00:34:32+5:30
अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठेच सलगता नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावानंतर काम तर सुरू होते. मात्र ते पूर्ण न करताच दुसरीकडे डेरा हलविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक भागात एकाचवेळी काम सुरू असल्याने यंत्रणेचाही अंदाज येत नाही.
हिंगोली शहरासाठी भूमिगत गटार योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. मलवहन व निस्सारणाचे काम यामुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र हे काम करताना सुरवातीपासूनच योग्य नियंत्रणाचा अभाव राहिला आहे. आधीच डबघाईला आलेल्या जीवन प्राधिकरण विभागाकडे या योजनेची देखरेख आहे. अपुरे व सक्षम मनुष्यबळ नसल्याने हा विभाग आधीच जर्जर आहे. विविध पाणीपुरवठा योजनांची त्यामुळे वाट लागली आहे. तर प्रादेशिक योजनांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच भूमिगत गटारसारख्या अवाढव्य योजनेवर या विभागाची देखरेख आहे. खरेच हा विभाग या कामांवर नियंत्रण ठेवत आहे की नाही, हा तर वादाचाच मुद्दा आहे. अधून-मधून वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या की, हा विभाग सक्रिय होतो. अन्यथा ही कामे रामभरोसेच चालत असल्याचे चित्र आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याने निश्चिंत आहे. काही भागात भूमिगत गटारच्या कामाची खोली जास्त असल्याने एकाच ठिकाणी यंत्रणा अडकून पडल्याचे दिसते. रिसाला बाजार, आदर्श कॉलेज परिसरात हे चित्र दिसते. तर काही भागात अर्धवट काम केले अन् यंत्रणा दुसरीकडे हलविली आहे. ते आता पुन्हा कधी सुरू होणार आहे, हा प्रश्नच आहे. एकंदर सर्वच भागातील काम पूर्ण झाल्याशिवाय ही योजना कार्यान्वित होणार नसली तरीही त्यातील सुसूत्रताच कामाला गती देणार आहे. नेमकी ही सुसूत्रता कोण लावणार, हा प्रश्न आहे.
भूमिगत गटार योजनेच्या कामाचा ठरावीक टप्पा गाठल्याशिवाय शहरातील रस्ते विकासासाठी शासनाकडून निधी मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा टप्पा गाठण्यासाठी तर धरसोड होत नाही ना? हा प्रश्न आहे. तसे असल्यास निधी येऊनही कामेच पूर्ण नसलेल्या भागात कसे रस्ते करणार, याचे उत्तर कुणाकडेच
नाही. दुसरे म्हणजे पावसाळा तोंडावर असल्याने काही भागातील मंजूर रस्ते तत्पूर्वी होण्यासाठी अशा भागातील भूमिगत गटारची वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात शहरात सर्वत्रच चिखल तुडवावा लागणार आहे.
यापूर्वीही भूमिगत गटार योजनेत अपुरी यंत्रणा असल्याने नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण व मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी फटकारले होते. त्यांनी पुन्हा लक्ष देणे गरजेचे आहे.