मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत

By रमेश वाबळे | Published: July 6, 2024 12:11 PM2024-07-06T12:11:48+5:302024-07-06T12:14:32+5:30

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे.

Lakhs of community members enter Hingoli for Maratha reservation Sanwad rally | मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत

मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत

हिंगोली : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व सगेसोयरे कायदा अंमलात आणावा, यासाठी हिंगोलीतून संवाद रॅलीचा प्रारंभ मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (दि.६) होत असून या रॅलीसाठी लाखों मराठा समाजबांधव हिंगोली ते दाखल झाले आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली. शासन मात्र चालढकल करीत असल्याने ६ ते १३ जुलै यादरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मराठा आरक्षण संवाद रॅली शांततेच्या मार्गाने काढण्याचा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यानिमित्त हिंगोलीत आज मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे बळसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. 

५१ उखळी तोफांची दिली जाणार सलामी...
मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले जाणार आहे. यावेळी ५१ उखळी तोफांची सलामी दिली जाणार आहे. त्यानंतर याच ठिकाणाहून रॅलीला प्रारंभ होणार आहे. ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने काढली जाणार असून, जवळपास साडेतीन लाख समाजबांधव या रॅलीला राहतील, असा अंदाज संयोजक समितीने व्यक्त केला.

मराठा आरक्षण संवाद रॅलीचा हिंगोलीतून श्रीगणेशा...
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा ‘श्रीगणेशा’ हिंगोलीतून होत आहे. ही रॅली हिंगोलीत ६ जुलै, परभणीत ७ जुलै, नांदेड ८ जुलै, लातूर ९ जुलै, धाराशिव १० जुलै, बीड ११ जुलै, जालना १२ जुलै व संभाजीनगर येथे १३ जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

चोख पोलिस बंदोबस्त...
रॅलीच्या निमित्ताने जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ५५ पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस दलातील ४५० कर्मचारी तसेच लातूरहून १५० पोलिस बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत.

Web Title: Lakhs of community members enter Hingoli for Maratha reservation Sanwad rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.