२ लाख ८६ हजारांची बॅग चोरट्याने केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:51+5:302021-09-14T04:34:51+5:30
पाऊस चालू असल्यामुळे सतीश रामकिशन गुंजकर (वय ३०) हे बागले किराणा दुकानाच्या शटरमध्ये बसले होते. यावेळेस गुंजकर यांनी ...
पाऊस चालू असल्यामुळे सतीश रामकिशन गुंजकर (वय ३०) हे बागले किराणा दुकानाच्या शटरमध्ये बसले होते. यावेळेस गुंजकर यांनी व्यवहार बंद करून ते पैशाचा हिशेब करत होते. तेव्हा त्यांनी पैशाची बॅग पाठीमागे ठेवली होती. याचदरम्यान पाळत ठेवून बसलेल्या चोरट्याने गुंजकर यांची बॅग लंपास केली. काही वेळाने त्यांनी मागे वळून पाहिले तर पैशांची बॅग गायब झाली होती. ती चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी कनेरगाव पोलीस चौकीला माहिती दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे, विजय कालवे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्याचदरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, बँकेचा सीसीटीव्ही पोलिसांनी तपासला. परंतु, त्या सीसीटीव्हीमध्ये काहीच रेकॉर्ड होत नसल्याचे निदर्शनास आले. गत दोन महिन्यापासून बँकेचे सीसीटीव्ही बंद आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कनेरगावनाका येथे होता आठवडी बाजार
दर सोमवारी आठवडी बाजार असतो. यावेळी आठवडी बाजाराच्या दिवशी महालक्ष्मी सण आल्याने बाजारात मोठी गर्दी होती. मराठवाडा ग्रामीण बँक ही मुख्य रस्त्यावर असल्याने येथे बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे. परंतु, कोणताही बंदोबस्त या ठिकाणी नव्हता. या बँकेत पोलीस बंदोबस्त किंवा गार्डची व्यवस्था करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येते. परंतु, याकडे नेहमीच कानाडोळा केला जात आहे. गर्दीचा फायदा घेऊन सोमवारी चोरट्यांनी बीसी एजंटला गंडविले.