‘लिगो’साठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू, भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 06:00 AM2018-08-05T06:00:00+5:302018-08-05T06:00:00+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणाऱ्या लिगो प्रयोगशाळेसाठी खासगी क्षेत्रातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणाऱ्या लिगो प्रयोगशाळेसाठी खासगी क्षेत्रातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने १०.३७ कोटी रुपये भूसंपादन विभागाकडे जमा केले आहेत.
लिगो प्रयोगशाळा प्रकल्पासाठी दुधाळा आणि सिद्धेश्वर या दोन गावातील ४५.४८ हेक्टर खाजगी जमीन संपादित केली जाणार आहे. यात ७१ शेतक-यांची जमीन जाणार आहे.
या जमिनीच्या खरेदीसाठी शासनाने भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी रुपये जमा केले आहेत. तर प्रकल्पासाठी लागणारी ५.९४ हेक्टर जमीन यापूर्वीच ‘लिगो’च्या व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. उर्वरित १३१.८३ हेक्टर वनजमिनीचा मुद्दा शासनाकडे प्रलंबित आहे. या जमिनीच्या प्रस्तावाला मंत्रालयस्तरावरून मंजुरी गरजेची असते.
केंद्र शासनापर्यंत हा प्रस्ताव जाणार असल्याने यासाठी लिगो प्रकल्पाच्या अधिका-यांकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यासाठी यापूर्वीच विशेष प्रकल्पाचा दर्जा देऊन सर्व प्रक्रिया जलद गतीने करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला आहे. आता खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वसमत उपविभागीय अधिकारी व लिगोच्या अधिका-यांमार्फत ही प्रक्रिया राबविली जात आहे.
वनजमिनीसाठी रेल्वेच्या प्रस्तावाची दिरंगाई
वर्धा-यवतमाळ-पुसद या रेल्वेमार्गासाठी ८ गावांची १0७ हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. यामध्ये खाजगी ८१.३0 हेक्टर जमीन होती. यापैकी ७५ हेक्टरचा ताबा रेल्वेला देण्यात आला आहे. तर ६.२४ हेक्टर जमिनीबाबत काम सुरू आहे. या भूसंपादनाची प्रक्रिया महसूल प्रशासनाने गतीने केली असली, तरीही २४ हेक्टर वनजमिनीच्या भूसंपादनासाठी रेल्वेचे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे अजून भूसंपादनाचा प्रस्तावच आलेला नाही. इतर शासकीय जमीन १.४२ हेक्टर लागत असून त्याचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.