लिगोसाठी ९ जानेवारीला अंतिम बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:08 AM2019-01-07T00:08:03+5:302019-01-07T00:08:54+5:30
औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे.
लिगो इंडिया या गुरुत्वाकर्षण लहरींचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी होत असलेल्या प्रयोगशाळेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही प्रयोगशाळा जगातील तिसरी प्रयोगशाळा ठरणार आहे. ही जागा अंतिम झाल्यानंतर जमीन हस्तांतरणाची मोठी प्रक्रिया पार पडली आहे. आता इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात अडसर न येण्यासाठी ९ जानेवारीला विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले आहे. यात संयुक्त मोजणी पिलर्सचे काम, हिंगोली तालुक्यातील जामवाडी येथील जमीन, नांदेड तालुक्यातील वसरणी येथील जमीन, वनजमीन, विविध कामांसाठीचा निधी आदीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. तर लिंबाळा येथील वीज केंद्र, सिद्धेश्वर धरणावरून पाणीपुरवठा योजना, जामवाडीत रस्ता, बोरजा ते दुधाळा रस्ता आदी बाबींचाही आयुक्त आढावा घेणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली असली तरीही काही कामे मात्र अजून पूर्ण होणे बाकी आहे. बैठकीनंतर गती मिळू शकेल.
जिल्ह्यासाठी ही प्रयोगशाळा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांची या भागात रेलचेल वाढणार आहे. त्याचा या भागातील विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. शिवाय इतरही अनेक दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र म्हणून आधीच प्रसिद्ध आहे. त्यात आता हा नवा प्रकल्प सोबतीला आल्याने या क्षेत्रालाही महत्त्व येणार आहे. या प्रकल्पाचे काम आता येत्या काही दिवसांत सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.