२४ रोजी आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:40 PM2018-09-21T23:40:02+5:302018-09-21T23:40:19+5:30
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे मागील अनेक दिवसांपासून कायम होते. आता २४ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत होत असल्याने ही निवडणूक प्रक्रिया एकप्रकारे सुरू झाल्याची नांदी मानली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे मागील अनेक दिवसांपासून कायम होते. आता २४ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत होत असल्याने ही निवडणूक प्रक्रिया एकप्रकारे सुरू झाल्याची नांदी मानली जात आहे.
बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मागील वर्षभरापासून काँग्रेसकडून तगादा लावला जात आहे. मात्र यावर प्रशासकीय मंडळ लादत सत्ताधारी भाजप-सेनेकडून निवडणुका लांबविल्या जात असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर सहकार खात्याने या निवडणुकांच्या कायद्यात बदल केला. १0 आरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्यांना मतदानाची संधी देण्यात आली आहे. पूर्वीच्या प्रकारात बदल झाला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन नियम, २0१७ नुसार बाजार समिती कार्यक्षेत्राच्या शेतकरी मतदारसंघाचे १५ समान भागात (गण) संघाचे १५ समान भागात विभाजन केले आहे. यापैकी ५ गणांचे सोडतीने आरक्षण जाहीर करावयाचे आहे. यात महिलांसाठी २ गण, इतर मागास प्रवर्गासाठी १ गण, विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी १ गण तर अनुसूचित जाती/जमातीसाठी १ गण राखीव करायचा आहे. यासाठी २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दुपारी १२ वाजता सोडत होणार आहे. यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी ही नवीन पद्धत आल्याने त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समितीची होणारी ही पहिलीच निवडणूक राहणार आहे. यासाठी मतदार याद्यांचे अंतिमीकरण आता होणार आहे.