लोकसभेआडून विधानसभेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:05 AM2019-04-02T00:05:33+5:302019-04-02T00:05:53+5:30
लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीचा धर्म पाळतच पुढील विधानसभेची तयारीही सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीचा धर्म पाळतच पुढील विधानसभेची तयारीही सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, हदगाव, किनवट व उमरखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. हिंगोलीमध्ये मागच्या वेळी भाजपचे तान्हाजीराव मुटकुळे यांनी विधानसभेत बाजी मारली. १९९८ ला काँग्रेस व त्यानंतर सातत्याने सेनेला आघाडी आहे. मात्र विधानसभेत काँग्रेस बाजी मारत आला. मागच्यावेळी काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव झाला. यावेळी पुन्हा मुटकुळे व गोरेगावकर हे लोकसभेच्या निमित्ताने आपापल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरून विधानसभेची रंगीत तालीम खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत. तर ही जागा काँग्रेसला सुटणार असली तरीही राकाँचे दिलीप चव्हाण हेही प्रचारात मागे नाहीत. वसमतमध्येही मागच्या लोकसभेला सेनेला आघाडी होती. विधानसभेतही सेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी बाजी मारत राकाँचे जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला होता. युती व आघाडीत आता हे दोघेही पुन्हा विधानसभेच्या तयारीसाठी लोकसभेच्या प्रचारात कसर सोडणार नसल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात भाजपचे शिवाजी जाधव व काँग्रेस अ.हाफिज हेही सक्रिय असून आघाडी व युतीचा धर्म पाळत आहेत. जाधव यांनी लोकसभेला उभे राहून बंडखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र माघार घेतली.
कळमनुरी मतदारसंघातही काँग्रेसचे आ.संतोष टारफे व शिवसेनेचे संतोष बांगर हे आपापल्या लोकसभा उमेदवारांसाठी आपली विधानसभा निवडणूक असल्याचे समजून झटत आहेत. मागच्या वेळी सेनेकडून पराभूत माजी आ.गजानन घुगे हेही सेनेच्या प्रचारात आहेत.
हदगाव विधानसभा मतदारसंघातीलच सुभाष वानखेडे हे लोकसभा लढवत असल्याने काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर पुढे त्यांचा फायदा होणार असल्याने जोरात कामाला लागले. शिवाय सेनेचे आ.नागेश पाटीलही हेमंत पाटील यांच्यासाठी प्रयत्न करून विधानसभेची वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
किनवटमध्ये मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने विजयी होणारे प्रदीप नाईक यांनी काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार सुरू केला आहे. तर शिवसेना-भाजपची स्थानिक नेतेमंडळी हेमंत पाटील यांच्यासाठी कामाला लागली आहे. उमरखेडमध्येही आ.राजेंद्र नगरधने हे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीपासून सक्रिय झाले असून माजी आ.विजय खडसे हेही वानखेडेंसाठी तेवढेच प्रयत्न करताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीतील विजय महत्त्वाचाच आहे. मात्र त्यापेक्षाही पुढील विधानसभेसाठी आपलीही तयारी होण्यासाठी प्रत्येक विधानसभा इच्छुक स्वत:हून खांद्यावर प्रचाराची धुरा घेत आहे. कार्यकर्त्यांनाही इमानेइतबारे कामाला लागण्याचा सल्ला देत आहेत. मात्र जेथे कुठे नाराजी आहे, तेथेही काम तर सुरू आहे. मात्र ते स्वत:साठी की लोकसभेच्या उमेदवारासाठी हे कळायला मार्ग नाही. निदान आपला चेहरा लोकांना दाखवण्यासाठी तरी ही मंडळी कामाला लागल्याचे दिसत आहे. बहुतांश जणांनी हीच शक्तीपरीक्षा असल्याचे समजून हाती कमान घेतली. मात्र काहींनी विधानसभेलाच काय ती परीक्षा व्हायची ते होऊन जाईल. आता केवळ तोंडओळख होण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
मागच्या लोकसभेला विधानसभेची तयारी करणाऱ्या काहींनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराशी दगाफटका केला. तर काहींनी इमानेइतबारे कामही केले. मात्र मोदी लाटेत शिवसेनेला येथील जागा राखता आली नाही. या मतदारसंघातील सर्वच जागा त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. आता परिस्थिती बदलली. दोन भाजप, दोन शिवसेना, एक काँग्रेस तर एक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीवरून बोध घेवून यावेळी प्रत्येकाला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. तर कार्यकर्त्यांनाही तशी संधी आहे.
मागच्या लोकसभेला अनेकांनी उघडच विरोधाची भूमिका घेतली होती. यावेळी मात्र तशा मूडमध्ये कोणीच दिसत नाही. आता ही बाब परवडणारी नसल्याचे सर्वांच्याच लक्षात आले.